मराठा वसतिगृहाच्या ठेक्याची सोडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 01:01 AM2018-09-22T01:01:47+5:302018-09-22T01:02:26+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृह चालविण्याचा ठेका देण्यासाठी शुक्रवारी सोडत पद्धतीने चिठ्ठी काढण्यात येऊन चालू वर्षापासून मेडीआर्ट फाउंडेशन नाशिक या संस्थेस ते चालविण्यासाठी देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
नाशिक : डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृह चालविण्याचा ठेका देण्यासाठी शुक्रवारी सोडत पद्धतीने चिठ्ठी काढण्यात येऊन चालू वर्षापासून मेडीआर्ट फाउंडेशन नाशिक या संस्थेस ते चालविण्यासाठी देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेंतर्गत ही योजना राबविली जाणार आहे. त्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या सरकारी अथवा खासगी इमारती भाडेतत्त्वावर घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे ठरल्याने नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी मेरीच्या ताब्यातील दोन इमारतींची डागडुजी व रंगरंगोटी करण्यात आली असून, सदरचे वसतिगृह चालविण्यासाठी शासनाने मान्यताप्राप्त संस्थांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातून स्व. रामगोपालजी कस्तुरचंदजी बूब बहुउद्देशीय संस्था, छत्रपती फाउंडेशन, पद्मतारा सामाजिक शैक्षणिक संस्था, जागृती सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकास संस्था, मातोश्री जसोदाबाई सोनी विकास संस्था, जय जनार्दन सेवाभावी संस्था व मेडीआर्ट फाउंडेशन यांनी अर्ज सादर केले होते. त्यातील दोन संस्था निकषात पात्र ठरल्याने त्यांची निवड करण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत सोडत पद्धतीने चिठ्ठी काढण्यात आली असता, त्यात मेडीआर्ट संस्थेची चिठ्ठी निघाली.
प्रवेशप्रक्रिया राबविणार
या वसतिगृहात २४० विद्यार्थ्यांची सोय करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १२० विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येईल व त्यानंतर ६० मुलींसाठी सोय करण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला शासनाकडून दिल्या जाणाºया आठ हजार निर्वाहभत्त्यातून संस्थाचालकाला पैसे अदा करण्यात येणार आहेत.