पंचवटी वाचनालयात व्याख्यानमाला
By admin | Published: December 27, 2015 10:49 PM2015-12-27T22:49:11+5:302015-12-27T22:50:40+5:30
पंचवटी वाचनालयात व्याख्यानमाला
पंचवटी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ व पंचवटी सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार (दि.३१) ते शनिवार (दि.२) या कालावधीत तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रकार्यवाह नथू देवरे यांनी पत्रकान्वये दिली आहे.
या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प मधुरा क्षेमकल्याणी या ‘सकारात्मक संवाद व रहस्य आनंदाचे’ या विषयावर गुंफणार आहेत. शुक्रवारी प्रा. के. मा. मोरे यांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व ग्रामगीता या विषयावर व्याख्यान होईल, तर शनिवारी तिसरे पुष्प प्रा. जयंत महाजन हे पत्रकारितेतील आगळेवेगळे अनुभव या विषयावर गुंफणार आहेत.
या व्याख्यानमालेला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. शांताराम रायते, डॉ. सुनील ढिकले, के. के. मुखेडकर, माधवराव भणगे, हिरालाल परदेशी आदिंसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, रविवार, दि. ३ जानेवारी रोजी वाचनालयात सकाळी ९ वाजता एकदिवसीय ज्येष्ठ नागरिक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. (वार्ताहर)