मुंगसेत कायदेविषयक जाणीव जागृती शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:48 AM2021-02-05T05:48:35+5:302021-02-05T05:48:35+5:30
गरिबी निर्मूलन योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी तालुक्यातील मुंगसे येथे तालुका विधि सेवा समिती, वकील संघ व तालुका प्रशासनाच्या संयुक्त ...
गरिबी निर्मूलन योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी तालुक्यातील मुंगसे येथे तालुका विधि सेवा समिती, वकील संघ व तालुका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात न्यायाधीश गांधी बोलत होते. यावेळी जिल्हा न्यायाधीश-२ डी.डी. कुरूलकर, जिल्हा न्यायाधीश-३ डी.वाय. गौड, सहदिवाणी न्यायाधीश एस.जी. लांडगे, वाय.पी. पुजारी, एन.एन. धेंड, उपविभागीय अधिकारी डॉ. विजयानंद शर्मा, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. आर.के. बच्छाव, सचिव ॲड. किशोर त्रिभुवन, चैतन्य जाधव, तालुका कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, कृषी अधिकारी भास्कर जाधव, किरण शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
तालुका प्रशासनामार्फत चांगले काम सुरू असल्याचे सांगताना न्यायाधीश गांधी म्हणाले, तालुका विधि सेवा समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात सर्व नागरिकांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. आपल्या न्याय्य हक्कांसाठी विधि सेवा प्राधिकरण समितीची स्थापना झाली असून, या माध्यमातून कुणीही न्याय्य हक्कांपासून वंचित राहणार नाही हेच उद्दिष्ट समोर ठेवून समितीचे कामकाज सुरू आहे. ज्या नागरिकांना काही अडचणी असतील त्यांनी थेट समितीकडे दाद मागावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कायदेविषयक शिबिराच्या आयोजनाचा उद्देश वकील संघाचे अध्यक्ष ॲड. आर.के. बच्छाव यांनी स्पष्ट केला, तर कुणीही न्याय्य हक्कांपासून वंचित राहणार नाही यासाठी विधि सेवा समितीची स्थापना करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. गरिबी निर्मूलनासाठी शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विधि सेवा समितीची असल्याने न्याय आपल्या दारी या संकल्पनेतून आज मुंगसे गावात आयोजित कार्यक्रमात गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद अभिनंदनास पात्र असल्याची भावना सहदिवाणी न्यायाधीश शपुजारी व धेंड यांनी मनोगतातून व्यक्त केली. गटविकास अधिकारी देवरे, शर्मा यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. सुनील बच्छाव यांनी आभार मानले.