कायदेविषयक साक्षरता शिबिर
By admin | Published: July 22, 2014 10:40 PM2014-07-22T22:40:32+5:302014-07-23T00:26:27+5:30
कायदेविषयक साक्षरता शिबिर
मालेगाव : येथील अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयात मालेगाव तालुका विधी सेवा समिती व मालेगाव वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक साक्षरता व मार्गदर्शन शिबिर झाले. अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सी. डब्ल्यू. सैंदाणी होते.
अध्यक्षपदावरून बोलताना न्यायाधीश सैंदाणी यांनी कायद्याने दिलेल्या हक्क व अधिकारांची योग्य ती जपणूक करण्याचे आवाहन केले. युनियन बॅँक आॅफ इंडिया मालेगाव शाखेचे व्यवस्थापक मनीषकुमार यांनी मायक्रो फायनान्स स्कीम याबाबत मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी केंद्र व राज्य सरकार यांच्या लघु उद्योगांकरिता असलेल्या चांगल्या योजनांविषयीची माहिती दिली. अॅड. किशोर त्रिभुवन यांनी अनुसूचित जाती जमाती-अधिकार व त्यासंबंधीचे कायदे याविषयी मार्गदर्शन केले. या कायद्याचा लाभ घेतानाच या कायद्याचा दुरूपयोग होणार नाही याविषयी काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पी.पी. अभंग यांनी नागरी हक्क संरक्षण कायद्याची माहिती दिली. सहदिवाणी न्यायाधीश पी.सी. काळे यांनी अपंग लोकांसाठी असलेल्या विविध कायद्यांची माहिती दिली. अॅड. बी. एल. लोखंडे यांनी विकलांग व अपंगांना भेडसावणाऱ्या विविध समस्या व त्यांना शासनस्तरावर असलेल्या अनेकविध सोयी सुविधांबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मालेगाव वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सुधाकर निकम यांनी केले. यावेळी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस. आर. जैसवाल, सहदिवाणी न्यायाधीश एस. एन. कठारे, व्ही. आर. अग्रवाल, एम.पी. भावसार, ए. एच. बेग, सी.पी. रघुवंशी, ए.आर. कल्हापुुरे, के.बी.एच. विधी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व्ही. व्ही. अहिवले यांच्यासह मालेगाव वकील संघाचे सर्व पदाधिकारी, वकील व पक्षकार आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन वकील संघाचे सचिव अॅड. चंद्रशेखर शेवाळे यांनी केले.