वारसदारासाठी नेत्यांची कसरत
By admin | Published: February 12, 2017 10:17 PM2017-02-12T22:17:36+5:302017-02-12T22:18:05+5:30
येवला : अवघे कुटुंब रंगले प्रचारात
दत्ता महाले येवला
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत यंदा प्रथमच सर्वच प्रमुख पक्ष निवडणूक रिंगणात आहेत. आमदार छगन भुजबळ यांची गैरहजेरी, भाजपा-सेनेची काडीमोड आणि राष्ट्रवादी-कॉँग्रेसमध्ये झालेली बिघाडी यामुळे चारही गटात यंदा स्थानिक नेत्यांनी आपले वारसदार या निवडणुकीत उतरवले आहेत. चारही गटांत आव्हान उभे राहिल्याने स्थानिक नेत्यांचा अवघा परिवार सध्या आपापल्या गटात राबत आहेत. वाडी वस्ती पिंजून काढत आहेत. शिवाय गाव तेथे गाडी असा शिरस्तादेखील ठरला आहे. उमेदवारांसह समर्थकांची वाहने पहाटेपासूनच वाडी वस्त्यांच्या दिशेने धावू लागली आहेत. गट-गण पिंजून काढत आहेत. सध्या बांधावर लक्ष ठेवाची हाक ऐकू येऊ लागली आहे.
अॅड. माणिकराव शिंदे यांनी मात्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भ्रमणध्वनीवरून आलेल्या संदेशाचा मान ठेवत आपले सुपुत्र शाहूराजे शिंदे यांची सोमवारी माघारी होणार असल्याचे सोशल संकेत मिडिया वरून दिले आहेत. गेल्या १४ वर्षापासून आमदार छगन भुजबळ यांच्या एकछत्री अंमलाखाली चाललेल्या कारभाराला प्रथम पालिकेत आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आखाड्यात पक्षांतर्गत शह दिला गेला. जहाज बुडू लागल्याची चाहूल लागताच अनेकांनी बाण हातात धरून उड्या घेतल्या. दरम्यान, माजी आमदार मारोतराव पवार यांनी नगरसूल गटातून आपली सून, सहकारनेते अंबादास बनकर यांनी आपले सुपुत्र संजय बनकर यांना पाटोदा गटातून, जिल्हा बँक अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी आपली पत्नी सुरेखा दराडे यांना वारसदार ठरवत उमेदवारी घेतली.
अंदरसूल गटातून माणिकराव शिंदे यांनी आले सुपुत्र शाहूराजे शिंदे यांना उमेदवारीतून थांबवत असल्याचे संकेत देऊन अंदरसूलसह प्रत्येक गटात बारकाईने लक्ष देण्याची खेळी करणे पसंत केले. यामुळे रिंगणात असलेल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पालिकेत झालेली जखम भरून काढण्याचा प्रयत्न शिंदे नक्की करतील असा सूर आहे. मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत सत्ता ताब्यात ठेवली तर आगामी आमदारकीचा दरवाजा उघडणे सोपे जाते हा अंदाज बांधून घरचा हक्काचा पक्का वारसदार निवडून आणण्यासाठी स्थानिक नेते सरसावले आहेत.
माजी आमदार कल्याणराव पाटील, आनंद शिंदे, राजूसिंग परदेशी यांनी जाणीवपूर्वक नेत्यांच्या गटात लक्ष घातले. त्यामुळे पाटोदा, राजापूर, अंदरसूल, मुखेड या चारही गटात मोठे आव्हान उभे राहिले आहे. स्थानिक नेत्यांनी आपल्या विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी केलेल्या खेळीवर नजर ठेवत, आपला आवाका नसताना भाजपाने तब्बल तेरा उमेदवार दिले. विशेषत: त्यांनी नगरसूल गटात उमेदवार मिळाला नाही की दिला नाही? हा चर्चेचा विषय आहे. राजापूर गटावर भाजपाने विशेष लक्ष केंद्रित करून ढाकणे यांना उमेदवारी दिली आहे.