सणासुदीच्या तोंडावर डाळी महागल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:04 AM2017-08-28T00:04:47+5:302017-08-28T00:04:53+5:30
नाशिक : सणासुदीच्या काळात डाळींचे भाव वधारल्याने गृहिणींमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला असून, महागाईची झळ स्वयंपाकघरापर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे बाजारात मुगाची आवक सुरू झाली असतानाही मूगडाळीच्या किमती वधारल्या आहेत. तसेच हरभराडाळ आणि तूर डाळींच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने येत्या काळात डाळींच्या किमती आणखी भडकण्याच्या भीतीने स्वयंपाकघरातील बजेटचा समतोल राखण्याचे गृहिणींसमोर आव्हान निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी संपूर्ण देशभरात डाळींचे भाव गगनाला भिडल्यामुळे सामान्यांच्या जीवनाचा आधार असणाºया डाळी ताटाबाहेरही गेल्या होत्या. यावर्षीही डाळींचे भाव वधारण्यास सुरुवात झाली असून, गेल्या पंधरवड्यात डाळींच्या किमतींमध्ये सुमारे १० ते १२ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्यावर्षाप्रमाणेच यंदाही डाळींच्या किमती कडाडण्याची भीती ग्राहकांमध्ये निर्माण झाली आहे. ही संधी साधून डाळींचा हंगामी व्यापार करणाºया काळ्याबाजारींकडून डाळींची साठेबाजी होण्याची शक्यता व्यक्त होत असून सरकारने सुरुवातीपासूनच साठेबाजांविरोधात कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. गेल्या वर्षी डाळींच्या विक्रमी दरवाढीमुळे शहरासह संपूर्ण देशवासीयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचे चित्र तत्कालीन परिस्थितीत पहायला मिळाले. ही भाववाढ डाळींची आवक घटल्यामुळे नाही, तर साठेबाजीमुळे झाल्याचा आरोप झाला. त्यानंतर सरकाने सर्व राज्य सरकारांना साठेबाजांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु, यावर्षी सरकाने सुरुवातीपासूनच खबरदारीची भूमिका घेण्याची गरज ग्राहक आणि व्यापारी वर्गातूनही व्यक्त होत आहे.
किमती उतरल्यास ग्राहकांना फायदा नाही
नाशिकमध्ये राजस्थान, इंदूर, लातूर, सोलापूर, बार्शी, जळगाव, अकोला, अकोट या भागातून प्रामुख्याने डाळींचा पुरवठा होतो. यात तूरडाळीसोबतच मूग, उडीद, मसूर व चणाडाळीचे प्रमाण मोठे आहे. डाळींच्या वाहतूक भाड्यापोटी प्रतिक्विंटल सुमारे २०० रुपये खर्च येतो. त्यात दलाल, घाऊक व्यापारी व किरकोळ व्यापाºयाचा नफा मिळवून ग्राहकाला पुरवठा होतो. दलाल प्रतिक्विंटल मागे केवळ १२ रुपयांपर्यत नफा कमावतो. तर घाऊक व्यापारी व किरकोळ व्यापारी बहुदा अधिक नफा कमवतात. किरकोळ दुकानदार नफा कमावण्यासाठी डाळींच्या उतरलेल्या किमती बाजारात तत्काळ लागू करीत नाहीत. त्या तुलनेत डाळींचे भाव चढले तर तत्काळ दरवाढ लागू करतात. त्यामुळे डाळींचे भाव उतरल्यानंतर त्याचा परिणाम दिसून येत नाही.
डाळींचे भाव वधारल्याने पुन्हा मागच्या वर्षासारखीच परिस्थिती निर्माण होते की काय अशी भीती आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात दीडशे ते दोनशे रुपयांनी डाळी खरेदी कराव्या लागल्या होत्या. यावर्षी पुन्हा सणासुदीच्या काळात डाळींच्या किमती वाढू लागल्या असून त्यामुळे घरचे बजेटच बिघडून जाण्याची शक्यता आहे. - ऋजुता तानपाठक, गृहिणी
गेल्या वर्षी सर्वच डाळी शंभरी पार कल्यामुळे डाळी खरेदी करताना घरातल्या इतर गरजांना मुरड घालावी लागत होती. त्यामुळे किमान यावर्षी तरी अशाप्रकारे भाववाढ होऊ नये यासाठी सरकारने योग्य नियोजन करण्याची गरज आहे. - शिल्पा पिसोळकर