बिबट्याचा वासरावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 03:45 PM2020-12-27T15:45:49+5:302020-12-27T15:46:11+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात मानवी व प्राणी यांच्यावर बिबट्याच्या हल्ल्यांचा धुमाकूळ सुरूच असून पिंपळगाव मोर, अधरवड, अडसरे बुद्रुक येथील बिबट्याने केलेल्या हल्ल्याच्या घटना ताज्या असतांनाच इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथील रघुनाथ वारुंगसे या शेतकऱ्याच्या पडवीत घुसून गायीच्या वासरावर हल्ला चढवत त्यांना जखमी केले.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात मानवी व प्राणी यांच्यावर बिबट्याच्या हल्ल्यांचा धुमाकूळ सुरूच असून पिंपळगाव मोर, अधरवड, अडसरे बुद्रुक येथील बिबट्याने केलेल्या हल्ल्याच्या घटना ताज्या असतांनाच इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथील रघुनाथ वारुंगसे या शेतकऱ्याच्या पडवीत घुसून गायीच्या वासरावर हल्ला चढवत त्यांना जखमी केले.
इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथे शनिवारी (दि.२६) रात्रीच्या सुमारास शेतकरी रघुनाथ वारुंगसे हे झोपलेले असतांना शेजारीच त्यांची जनावरांच्या निवारासाठी असलेल्या पडवीत इतर जनावरांच्या सोबत दोन तीन वासरे असून यावेळी भक्ष शोधण्यासाठी आलेल्या बिबट्याने पडवीत घुसून वासराला फरफटत घेऊन जात असतांनाच या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांनी पाहिले. या बिबट्याला पळविण्यासाठी अखेर फटाके वाजवत तसेच आरडाओरडा करत बिबट्याच्या तावडीतून वासराची सुटका केली.
याआधी काही दिवसांपूर्वीच याच ठिकाणी राहत असलेल्या बाबुराव गोंडके या शेतकऱ्याच्या श्वानावर बिबट्याने हल्ला चढवत त्याला ठार केले होते. या ठिकाणी अजून एक बिबट्या असून शेजारीच असलेले शेतकरी पंडीत धांडे यांच्या निदर्शनास आल्याचे यावेळी माहिती देतांना सांगितले. यामुळे या एकाच ठिकाणी दोन वेगवेगळे बिबटे असल्याची खात्रीलायक माहिती प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितले.
यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याच्या या दहशतीमुळे शेतकरी रात्री
पिकांना पाणी देण्यासाठी बाहेर पडण्यास घाबरत आहेत. बिबट्याच्या या वाढत्या हल्ल्यांपासून वाचविण्यासाठी या ठिकाणी वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी पंडीत धांडे, रघुनाथ वारुंगसे, ॠषिकेश धांडे, प्रल्हाद धांडे, संदिप वारूंगसे, बाबुराव गोंडके, आदींसह परिसरातील शेतकरी करीत आहेत.
बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे परिसरातील शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी बाहेर पडण्यास घाबरत आहेत. या एकाच ठिकाणी महिन्याभरातच बिबट्याने दुसऱ्यांदा हल्ला केला असून वनविभाग याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने भविष्यात सदर हल्लेखोर बिबट्या मानवावर हल्ला करु शकतो. तरी वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून या परीसरात पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे.
- पंडित धांडे, शेतकरी, पाडळी देशमुख.
(२७ नांदूरवैद्य)
पाडळी देशमुख येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेले वासरू.