ऊसतोड मजुराच्या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 01:13 AM2021-10-04T01:13:24+5:302021-10-04T01:14:15+5:30
मातोरी : मातोरी गावापासून बोरगडच्या दिशेने अवघ्या सहा ते सात किलोमीटरवर असलेल्या मौजे धागूर शिवारात एका उसाच्या शेतालगत मजुरांच्या ...
मातोरी : मातोरी गावापासून बोरगडच्या दिशेने अवघ्या सहा ते सात किलोमीटरवर असलेल्या मौजे धागूर शिवारात एका उसाच्या शेतालगत मजुरांच्या वस्तीवरून रविवारी (दि.३) संध्याकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास बिबट्याने मजुरांच्या कुटुंबातील एका चिमुकलीला उचलून जबड्यात धरून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. रात्री उशिरापर्यंत वनविभागाचे पथक व गावकऱ्यांकडून मुलीचा शोध आळंदी धरणाच्या परिसरातील डोंगरालगत घेण्यात आला, मात्र मुलगी आढळून आली नव्हती.
गिरणारे गावापासून जवळच असलेल्या वाडगावात तीन दिवसांपूर्वीच बिबट्याच्या हल्ल्यात शिवन्या नावाच्या बालिकेचा बळी गेला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा बालिकेवर बिबट्याने झडप घालत उचलून जंगलात घेऊन पळाल्याची घटना अवघ्या वाडगावपासून दहा ते बारा किलोमीटरवरील जुने धागूरमध्ये घडली. बिबट्याचा जुने धागूर परिसरात मागील काही दिवसांपासून मुक्त संचार सुरू आहे. याबाबत दिंडोरी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतीकडून ठराव करत पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली होती; मात्र पिंजरा रविवारपर्यंत लावण्यात आला नसल्याचे येथील पोलीस पाटील अशोक सांगळे यांनी सांगितले.
जुने धागूर येथील बागायतदार विलास माळी यांच्या मळ्यात द्राक्षबाग छाटणी करण्यासाठी गुजरात राज्यातील एका पाड्यावरील मजुरांचा कबिला काही दिवसांपूर्वी दाखल झाला. येथील ऊसशेतीजवळ त्यांनी डेरा टाकत राहुट्या ठोकल्या. संध्याकाळच्या सुमारास चूल पेटविण्याची लगबग सुरू असताना शेतात उघड्यावर मुले खेळत होती. यावेळी अंधारातून बिबट्याने अचानक वस्तीवर येत एका चार वर्षांच्या चिमुकलीला जबड्यात धरून वेगाने धूम ठोकल्याचे ऊसतोड कामगारांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तत्काळ डोंगराच्या दिशेने हातात बॅटऱ्या, लाठ्या-काठ्या घेत धाव घेतली. तसेच वनविभागालाही माहिती देण्यात आली. काही वेळानंतर वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनीही या भागात रात्री साडेनऊ वाजेपर्यंत शोध घेतला, मात्र मुलगी कोठेही आढळून आली नाही. मुलीचे वडील शिवा वड यांनी याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला आहे.