चांदोरीत गाईवर बिबट्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 01:04 AM2021-02-27T01:04:45+5:302021-02-27T01:05:04+5:30
सोमवारी (दि.२२) नाठे वस्ती येथे बिबट्याने गाय व वासरावर हल्ला केला होता.
चांदोरी : निफाड तालुक्यातील चांदोरी येथील नागापूर फाटा तसेच नाठे वस्ती शेतशिवारात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्या धुमाकूळ घालत असून त्याला जेरबंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सोमवारी (दि.२२) नाठे वस्ती येथे बिबट्याने गाय व वासरावर हल्ला केला होता. चांदोरीहा परिसर गोदावरी नदीकाठी बागायती क्षेत्राखाली येत असल्याने सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी रात्रंदिवस शेतावर रखवालीसाठी जात आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांची मशागतीची कामे प्रगतीपथावर असताना गेल्या आठ दिवसांपासून या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातल्याने शेतकरी प्रचंड दहशतीखाली आहेत. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे शेतकऱ्यांना दर्शन घडत असल्याने शेतकरी प्रचंड भयभीत झाले आहेत. मंगळवारी ( दि. २३) शिवाजी मोरे हे शेतास रात्रीचे पाणी देत असतांना बिबट्या एका झाडावर दबा धरून बसला होता. याबाबत वनविभागाला माहिती दिली असता, वनविभाग गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलत नसल्याने शेतकरी रोष व्यक्त करीत आहेत. कोट....
गोदकाठ भागात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडत असून
याबाबत वनविभागाने योग्य ती दखल घ्यावी व बिबट्याचा बंदोबस्त करावा.
- शिवाजी मोरे ( स्थानिक नागरिक )