टिंगरी येथील तरुणावर बिबट्याचा हल्ला
By admin | Published: June 16, 2014 12:31 AM2014-06-16T00:31:51+5:302014-06-16T01:05:24+5:30
बिबट्याने हल्ला केल्यामुळे गंभीर जखमी झाला आहे.
आसखेडा : टिंगरी (ता. बागलाण) येथील आदिवासी तरुण भरत धुडकू गायकवाड (३५) हा गावाशेजारी जंगल परिसरात बकऱ्या व मेंढ्या चारण्यासाठी गेला असता बिबट्याने हल्ला केल्यामुळे गंभीर जखमी झाला आहे.
टिंगरी येथील रहिवासी भरत धुडकू गायकवाड हा मेंढ्या व बकऱ्या घेऊन नेहमीप्रमाणे जंगल परिसरात चारण्यासाठी गेला होता. सायंकाळी बकऱ्या घराकडे नेत असताना अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने भरतवर हल्ला चढविला. भरतने आरडाओरड केल्यामुळे त्याचा साथीदार छोटू नानाजी गायकवाड हा धावून आला व त्याने बिबट्यापासून भरतची सुटका केली. त्याच क्षणात बिबट्याने धूम ठोकली. गंभीर स्वरूपाची जखम झाल्यामुळे भरत यास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र भरतला अस्वस्थ जाणवू लागल्याने नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, वनपाल विनय देवरे यांना भ्रमणध्वनीद्वारे सविस्तर माहिती कळवूनदेखील त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचे भरत यांनी सांगितले. सद्या जंगलाची सर्रास तोड चालू आहे. मात्र सुस्त झालेला संबंधित विभाग मात्र दुर्लक्ष करीत आहे.
त्यामुळे वन्यप्राणी मोकाट फिरत आहेत, असे गावकऱ्याचे म्हणणे आहे. (वार्ताहर)