आगासखिंड शिवारात दुचाकीवर बिबट्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:13 AM2021-04-14T04:13:19+5:302021-04-14T04:13:19+5:30
सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आगासखिंड शिवारात कडवा कालव्यात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणांवर हल्ला करून त्यांना ...
सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आगासखिंड शिवारात कडवा कालव्यात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणांवर हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. आगासखिंड येथील अक्षय ज्ञानेश्वर बरकले (२२) व ओंकार वसंत बरकले (२५) हे दोघे तरुण दुचाकीहून रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास गहू काढणीसाठी हार्वेस्टर मशीन पाहण्यासाठी पाटील मळ्यातून जाधव वस्तीकडे जात असताना कडवा कालव्यात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवर हल्ला केला. पाठीमागून बिबट्याने अचानक हल्ला केल्याने दुचाकी घसरून दोघेही तरुण खाली पडले. यावेळी बिबट्याने अक्षयच्या पाठीवर पंजाने हल्ला केला तर ओंकारच्या उजवा हात जबड्यात घेऊन चावा घेतला. दोघांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्या पळून गेला. दोघांही तरुणांना रात्री बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडून देण्यात आले.
---------------
ग्रामस्थांमध्ये घबराट
या घटनेची माहिती सिन्नर वनपरिक्षेत्राला देण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सदगीर यांनी दुपारी आगासखिंड शिवारात भेट देऊन या परिसरात पिंजरा लावण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. दरम्यान, आगासखिंड शिवारात दुचाकीवर बिबट्याने हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे रात्रीच्यावेळी शेतीला पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या व परगावाहून येणाऱ्या ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
सिन्नर तालुक्यातील आगासखिंड शिवारात बिबट्याने दुचाकीवर हल्ला केल्याने जखमी झालेले तरुण. (१३ सिन्नर ३/४)
===Photopath===
130421\13nsk_7_13042021_13.jpg
===Caption===
१३ सिन्नर ३/४