भरदिवसाच बिबट्याचा युवकावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:19 AM2021-02-17T04:19:11+5:302021-02-17T04:19:11+5:30
सिन्नर: तालुक्यातील दापूर येथे शेतात मक्याला पाणी भरणाऱ्या युवकावर भरदिवसा बिबट्याने हल्ला केल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी ...
सिन्नर: तालुक्यातील दापूर येथे शेतात मक्याला पाणी भरणाऱ्या युवकावर भरदिवसा बिबट्याने हल्ला केल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. युवकाच्या मोठ्या भावाने व वडिलांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने मक्याच्या शेतात पळ काढला व युवकाचे प्राण वाचले.
तेलमाथा भागात राहणाऱ्या सुधाकर आव्हाड यांची बेलगया मळ्यात शेतजमीन आहे. या शेतात आव्हाड यांनी मक्याचे पीक घेतले आहे. आव्हाड यांची मुले मंगेश आणि भगवान हे दोघे वडिलांसह मंगळवारी सकाळी शेतातील मक्याला पाणी भरत होते. सकाळी दहा वाजेच्या सुमारास तहान लागल्याने मंगेश व भगवान हे शेततळ्याजवळ पाण्याची बाटली घेण्यासाठी गेले. पाणी पिऊन दोघे मक्याकडे येत असतांना बिबट्याने अचानक मंगेश (२३) याच्यावर हल्ला केला. जवळ १० ते १५ फुटावर असलेल्या भगवान याने आरडाओरडा केल्यानंतर शेतात असलेल्या वडिलांनी पळत येत आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या मक्याच्या शेतात पळून गेला.
या हल्ल्यात मंगेशच्या छाती, कान, गाल, डाव्या हाताला जखमा झाल्या. भाऊ व वडिलांनी जखमी मंगेशला दुचाकीवर तातडीने दापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. जखमा गंभीर असल्याने मंगेश यास सिन्नर नगरपरिषदेच्या रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे, किरण गोर्डे, वनपाल दीपक तुपलोंढे यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पिंजरा लावल्याची माहिती वनविभागाने दिली.
-------------
दापूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेला युवक व जखमी युवकावर दापूर येथे उपचार करतांना डॉक्टर. (१६ सिन्नर ६)