पाय फ्रॅक्चर असूनही बिबट्याचा परतवला हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 12:06 AM2021-11-10T00:06:44+5:302021-11-10T00:07:20+5:30
इगतपुरी : शहरातील सह्याद्रीनगर भागात रॅक पडण्याचा आवाज आल्याने काय झाले हे बघण्यासाठी गेलेल्या रेल्वेचे माजी कर्मचारी नारायण निकम यांच्यावर मंगळवारी (दि. ९) पहाटे ५ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. २ ते ३ फुटावर दबा धरून असलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. नारायण निकम यांचा पाय फॅक्चर असतानाही निकम यांनी हल्ला परतवून लावला. बिबट्याने परत झडप घातली असता रॅक त्यांच्यामध्ये आल्याने व मोठा आवाज झाला. यावेळी त्यांनी आरडाओरड करताच बिबट्याने धूम ठोकली.

जखमी नारायण निकम यांना इगतपुरी येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा बछड्यांसह या भागात वावर असून, पिंजरा लावूनही बिबट्या पिंजऱ्यात येत नाही. इतक्या दिवस प्राण्यांची शिकार करणाऱ्या बिबट्याने आता मानवावर हल्ला सुरू केल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. ह्या भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांनी मागणी केली असून, बिबट्याची दहशत पुन्हा एकदा वाढली आहे. दिवाळीत फटाक्याच्या आवाजाने बिबट्याची दहशत कमी झालेली असतानाच मंगळवारी पुन्हा इगतपुरी शहरात बिबट्याने एका माजी रेल्वे कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याने नागरिकांत दहशत वाढवली आहे. यापूर्वी पिंजरे लावूनही बिबट्या जेरबंद होत नसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. तातडीने ह्या भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी पुन्हा एकदा वाढली आहे.
बिबट्यांसाठी ट्रॅप कॅमेरे
गेल्या आठ दिवसांपूर्वी वनविभागाने येथे ट्रॅप कॅमेरे लावले असून, कॅमेऱ्यात बिबट्याची मादी व सोबत दोन बछडे कॅमेरात दिसून आले आहेत. मात्र सदरची मादी दोन ठिकाणी ठेवलेल्या पिंजऱ्याकडे पाठ फिरवत असून, त्यांच्या सर्व हालचालींवर टेहळणी करून लक्ष ठेवले जात असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी दिली आहे. तसेच ड्रोन कॅमेराच्या साह्याने बिबट्याचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी त्यांनी पाहिले असून, या परिसरात दोन पिंजरे लावूनही ठेवले आहेत. मात्र बिबट्या या पिंजऱ्यात बंद होत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. या ठिकाणी वनविभागाच्या फॉरेस्ट खात्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी येऊन सविस्तर आढावा घेतला. नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकट्याने घराबाहेर पडू नये तसेच बिबट्याच्या मादीला लवकरात लवकर पकडू, असे आश्वासन बिरारीस यांनी दिले आहे.
इगतपुरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले नारायण निकम व घराच्या मागील बाजूस बिबट्याच्या पायाचे ठसे दिसत आहे. (०९ इगतपुरी २/३/४)