बिबट्याचा दुचाकीस्वारावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 12:54 AM2021-04-24T00:54:12+5:302021-04-24T00:54:30+5:30

आगासखिंड येथे बुधवारी (दि.२१) रात्री दहाच्या सुमारास बिबट्याने दुचाकीवर झडप घालत युवा शेतकऱ्यास गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. बिबट्याने दुचाकीवर हल्ला चढविण्याची ही या  परिसरातील सातवी घटना असल्यामुळे  शेतकरीवर्गासह दुचाकी चालकांत प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

Leopard attacks biker | बिबट्याचा दुचाकीस्वारावर हल्ला

बिबट्याचा दुचाकीस्वारावर हल्ला

Next
ठळक मुद्देआगासखिंडचा युवक जखमी : हल्ला होण्याची सातवी घटना

सिन्नर : आगासखिंड येथे बुधवारी (दि.२१) रात्री दहाच्या सुमारास बिबट्याने दुचाकीवर झडप घालत युवा शेतकऱ्यास गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. बिबट्याने दुचाकीवर हल्ला चढविण्याची ही या  परिसरातील सातवी घटना असल्यामुळे  शेतकरीवर्गासह दुचाकी चालकांत प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
   आगासखिंड येथील प्रगत ॲग्रोचे संचालक प्रताप विठोबा जाधव (२८) हे बुधवारी (दि.२१) रात्री दहा वाजेच्या सुमारास कडवा कालव्याच्या रस्त्याने  दुचाकीने  आपल्या घराकडे जात असताना कालव्यालगत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दुचाकी चालवत असलेल्या प्रताप जाधव यांच्यावर झडप घातली. जाधव यांचा तोल जाऊन ते खाली पडले. बिबट्याच्या पायाच्या पंजाने जाधव यांच्या डाव्या हातावर गंभीर जखमा झाल्या. प्रताप जाधव यांनी आरडाओरड केल्याने चवताळलेल्या  बिबट्याने अंधारात धूम ठोकली. जखमी जाधव यांना अशोक जाधव, तानाजी जाधव, ओमकार जाधव  व वनविभागाचे सद‌्गीर यांनी नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात उपचारासाठी हलविले. तिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर औषधोपचार करून त्यांना घरी सोडले. वनविभागाने या घटनेची दखल घेतली असून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. दरम्यान,बेलू-आगासखिंड परिसरात दुचाकींवर हल्ला करणाऱ्या व पिंजऱ्यात जेरबंद न होणाऱ्या बिबट्याचा वनविभागाने दुसऱ्या पद्धतीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आगासखिंडचे सरपंच  शिवाजी आरोटे, माजी सरपंच दत्तू आरोटे, उपसरपंच लहानू बरकले, बेलूचे सरपंच प्रकाश तुपे, संजु तुपे, अंकुश तुपे आदींनी केली आहे.
पिंजऱ्याजवळच हल्ला 
बेलू - आगासखिंड परिसरात बिबट्याचे दुचाकींवर सातत्याने हल्ले सुरूच आहे. गेल्या हप्त्यात बिबट्याने याच ठिकाणी दुचाकीवर झडप घालत ओमकार बरकले व अक्षय बरकले यांना गंभीर जखमी केले होते. बिबट्याच्या या हल्ल्यानंतर वनविभागाने येथे पिंजरा लावलेला आहे. विशेष म्हणजे या पिंजऱ्यापासून हाकेच्या अंतरावरच बिबट्याने प्रताप जाधव यांच्या दुचाकीवर हल्ला करून त्यांना जखमी केले. यामुळे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद होण्याची शक्यता धूसरच आहे.

Web Title: Leopard attacks biker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.