सुदैवाने प्राण वाचले : चेहडी शिवारात बिबट्याचा मुलावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 08:53 PM2020-07-04T20:53:04+5:302020-07-04T21:05:25+5:30
जखमी आयुषच्या मानेला व डोक्याला बिबट्याच्या हल्ल्यात दुखापत झाली असून त्याच्यावर बिटको रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलाची प्रकृती स्थितर असून तत्काळ सातपुते मळ्याच्या भागात पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी सांगितले.
नाशिक: दारणा नदीच्या खोऱ्यात बिबट्याकडून हल्ले सुरूच आहे. शनिवारी (दि.४) रात्री आठ वाजेच्या सुमारास सातपुते मळ्यात अंगणात खेळणा-या नऊ वर्षीय आयुष जयंत सातपुते या चिमुकल्यावर बिबट्याने झडप घातली; मात्र सुदैवाने त्याचे प्राण वाचले. बिबट्याने पंजा मारल्यामुळे आयुष जखमी झाला असून त्याच्यावर नाशिकरोडच्या बिटको रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दारणा नदीकाठालगतच्या गावांमधील बिबट्यांचा मुक्त संचार सुरूच असून या भागातील दहशत काही करेना कमी होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. पशुधनासह लहान मुलांवर बिबट्याकडून होणारे हल्ले यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी (दि.३०) कोटमगावात एका १४ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर गुरूवारी (दि.२) जाखोरीत एका पिंजºयात बिबट्याची प्रौढ मादी जेरबंद झाली. यानंतर दोन दिवसांतच बिबट्याने जाखोरीपासून जवळच असलेल्या चेहडी शिवारातील सातपुते मळ्यात चिमुकल्यावर हल्ला केला. तसेच शिंदे गावातील चिंचोळी फाटा परिसरात सांगळे वस्तीवर एका वासराला बिबट्याने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ठार केल्याची घटना घडली. या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास सामनगावात वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्येही बिबट्याची मुक्त भटकंती कैद झाली आहे.
या भागात सातत्याने वनविभागाचे पथके कार्यरत आहेत. जखमी आयुषच्या मानेला व डोक्याला बिबट्याच्या हल्ल्यात दुखापत झाली असून त्याच्यावर बिटको रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलाची प्रकृती स्थितर असून घटनास्थळाची पाहणी करून तत्काळ सातपुते मळ्याच्या भागात पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी सांगितले.-
दारणा खो-यातील ही गावे दहशतीखाली
बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पथकांकडून अथक परिश्रम घेतले जात आहेत; मात्र दारणा नदीच्या खोºयालगतच्या चेहडी, एकलहरे, हिंगणवेढे, बाभळेश्वर, मोहगाव, शिंदे, पळसे, शेवगेदारणा, जाखोरी, कोटमगाव, भगूर, दोनवाडे या सर्व गावांमध्ये बिबट्याची दहशत कायम आहे.