वटारला बिबट्याचा वृद्धेवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 01:40 PM2020-12-15T13:40:04+5:302020-12-15T13:40:58+5:30
वटार : येथील तळवाडेरोड लगत सोमवारी सायंकाळी ६:४५ वा अंगणात बसलेल्या वृद्ध महिलेवर भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्याने हल्ला चढवत डोक्याला पंजा मारून जखमी केले.
वटार : येथील तळवाडेरोड लगत सोमवारी सायंकाळी ६:४५ वा अंगणात बसलेल्या वृद्ध महिलेवर भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्याने हल्ला चढवत डोक्याला पंजा मारून जखमी केले. महिलेने आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला व महिलेचे प्राण वाचले. तात्काळ या महिलेला सटाणा आरोग्य केंद्रात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.
गेल्या एक महिन्यापासून धुमाकूळ घातला असुन दररोज शेतकरयांच्या दुभत्या जनावरांवर ताव मारत आहे. दररोजच् सायंकाळ पासुनच कोणत्या ना कोणत्या शेतकऱ्याला बिबट्या दर्शन देतो. पुन्हा एकदा ग्रामस्त भयभीत झाले असून पशुधन पुन्हा धोक्यात आले आहे. दरवर्षी ह्या परिसरात बिबट्याच्या वावर असतो, येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुधाची जनावरेही मोठ्या प्रमाणात आहेत. पण पुन्हा पुन्हा बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी धास्तावला आहे.
गेल्या सहा महिन्यात सहा ते सात वेळा हल्ले करून २० ते २५ निष्पाप मुक्या प्राण्यांचा बळी गेला. अनेक दिवसापूर्वी सावतावाड़ शिवरात बिबट्याचा वावर आहे. वनपाल उडवा उडवीचे उत्तर देऊन वनपाल आपल्या अंगावरचे काम झटकत असतात. मेंढपाळ तर दर वर्षी जेरिस आले असून दरवर्षी १० ते १२ मेँढ़या बळी द्याव्या लागत आहेत. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुग्ध व्यवसायही शेतीला जोड़धंदा म्हणून करतो. परिसरात बिबट्याच्या वावर असल्यामुळे रात्र ही जागुन काढावी लागत आहे, मेंढपाळ फटाके फोडून पाळीव प्राण्यांचे संरक्षण करत आहेत.
--------------
बऱ्याच दिवसापासून आम्हाला शेतात बिबटे मोकळे दिसतात. जनावरांना चारा कापण्यासाठी शेतात जाता येत नाही. आज अनेक संकटाना तोंड देऊन शेती व्यवस्था सुरळीत ठेवली आहे. त्यात अशी हानी होत राहिली तर आम्ही काय करायचे? आज माझ्या आई वरती हे संकट आले, उद्या कोणावरहि येऊ शकते त्यासाठी वनविभागने तातडीच्या उपाययोजना कराव्यात.
- कारभारी पवार, शेतमजूर वटार