वटारला बिबट्याचा वृद्धेवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 07:15 PM2020-12-15T19:15:50+5:302020-12-16T00:49:50+5:30
वटार : येथील तळवाडेरोडलगत सोमवारी सायंकाळी ६:४५ वाजेच्या सुमारास अंगणात बसलेल्या वृद्ध महिलेवर भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्याने हल्ला चढवत डोक्याला पंजा मारून जखमी केले. महिलेने आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला व महिलेचे प्राण वाचले. तत्काळ या महिलेला सटाणा आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
गेल्या महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून, दररोज शेतकऱ्यांच्या दुभत्या जनावरांवर ताव मारत आहे. दररोजच सायंकाळपासूनच कोणत्या ना कोणत्या शेतकऱ्याला बिबट्या दर्शन देतो. पुन्हा एकदा ग्रामस्थ भयभीत झाले असून, पशुधनही धोक्यात आले आहे. दरवर्षी या परिसरात बिबट्याच्या वावर असतो, येथील शेतकरी पशुपालन करणारा असून. दुभती जनावरेही मोठ्या प्रमाणात आहेत. बिबट्याचे सतत दर्शन होत असल्याने शेतकरी धास्तावला आहे.
गेल्या सहा महिन्यांत बिबट्याने सहा ते सात वेळा हल्ले करून २० ते २५ निष्पाप मुक्या प्राण्यांचा बळी गेला. अनेक दिवसांपासून सावतावाड शिवारात बिबट्याचा वावर आहे. उडवाउडवीचे उत्तर देऊन वनपाल आपल्या अंगावरचे काम झटकत असतात. मेंढपाळ तर जेरीस आले असून, दरवर्षी १० ते १२ मेंढ्या बळी द्याव्या लागत आहेत. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून, दुग्ध व्यवसायही शेतीला जोडधंदा म्हणून करतो. परिसरात बिबट्याच्या वावर असल्यामुळे रात्रही जागून काढावी लागत आहे, मेंढपाळ फटाके फोडून पाळीव प्राण्यांचे संरक्षण करत आहेत.
बऱ्याच दिवसांपासून आम्हाला शेतात बिबटे मोकळे दिसतात. जनावरांना चारा कापण्यासाठी शेतात जाता येत नाही. आज अनेक संकटांना तोंड देऊन शेती व्यवसाय सुरळीत ठेवली आहे. त्यात अशी हानी होत राहिली तर आम्ही काय करायचे, आज माझ्या आईवरती हे संकट आले, उद्या कोणावरही येऊ शकते त्यामुळे वनविभागाने तातडीच्या उपाययोजना कराव्यात.
- कारभारी पवार, शेतमजूर, वटार