भादवण परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

By admin | Published: September 8, 2015 11:17 PM2015-09-08T23:17:30+5:302015-09-08T23:21:06+5:30

घबराट : शिंगरू केले फस्त; मेंढपाळांवर स्थलांतराची वेळ

Leopard in the Bhadavana area | भादवण परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

भादवण परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

Next

पिळकोस : कळवण तालुक्यातील भादवण गाव व परिसरात बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. प्रवीण बाळासाहेब जाधव यांच्या पिळकोस-बगडू पुलाजवळील मळ्यातील त्यांच्या घराशेजारील वावरात मेंढपाळ तळ ठोकून होते. काल रात्री बिबट्याने अचानक हल्ला केल्याने मेंढ्यांसमवेत असलेल्या धनगर बांधवाचा थरकाप उडाला. बिबट्याच्या त्या हल्ल्यात मेंढपाळ मुक्का रावजी पवार (मुळाणे) यांच्या घोडीचे शिंगरू बिबट्याने मक्याच्या शेतात ओढून नेऊन फस्त केले. दोन मेंढ्या नदीकडे बिबट्याने ओढून नेल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
बिबट्याच्या उपद्रवामुळे मेंढपाळांनी भादवण परिसरातून स्थलांतरित होण्यास सुरुवात केली असून, शेळीपालन करणाऱ्या आदिवासी बांधवांना पशुधनाच्या सुरक्षिततेसाठी रात्र जागून काढावी लागत आहे. परिसरातील बिबट्या जेरबंद करणे अत्यंत गरजेचे झाले असून, भीतीचे वातावरण पसरले आहे. वनरक्षक घुगे, वनपाल व्ही. बी. पाटील यांनी सकाळी कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी येऊन परिसराची पाहणी केली व पंचनामा केला. नागरिकांनी पिंजरा
लावण्याचा आग्रह धरला असून, बिबट्याला लवकर जेरबंद करावे, अशी मागणी केली आहे.
कळवण तालुक्यातील मोकभणगी, विसापूर, पांढरीपाडा, भादवण, पिळकोस, गांगवन, धनगरपाडा ही गावे चौरंगनाथ किल्ला व देवडोंगराच्या पायथ्याजवळील असून या गावांना बिबट्याचा
उपद्रव सहन करावा लागतो. मागील
वर्षी मोठाभाऊ सोनवणे या पशुपालन करणाऱ्या बांधवाच्या बारा शेळ्या बिबट्याने फस्त केल्या होत्या. त्याच्याजवळ आज एकही शेळी नसून त्याचा शेळीपालनाचा व्यवसाय तेव्हापासून खंडित झाला.
या परिसरात जंगलात सर्वाधिक मोर, ससे, पोपट, माकडे, कोल्हे,
लांडगे व आता बिबटे व मादीचे वास्तव्य वाढले आहे. मोर, ससे, पोपट, माकडे यांनी जरी जंगलाच्या सौंदर्यात वाढ झाली असली तरी, ज्या शेतकऱ्यांनी जंगलाचे रक्षण केले आज त्याच शेतकऱ्यांना या घनदाट जंगलाची भीती वाटू लागली आहे. बिबट्याच्या दहशतीतून कायमस्वरुपी मुक्त करण्याची आज वेळ आली
आहे. आज ग्रामीण भागातील सत्तर
टक्के शेतकरी आता शेतात वास्तव्य
करत असून, शेत परिसरात बिबट्याच्या वावरण्याने शिवारातील शेतकऱ्यांनाही सतत बिबट्याची धडकी भरलेली असल्याचे
शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. तसेच बिबट्याकडून पशुधनाचे जे काही नुकसान होते त्याचा योग्य
मोबदला मिळत नसून शेतकऱ्यांनी पशुधन सांभाळावे की नाही
याचा विचार शेतकरी व पशुपालकांना पडत आहे. कळवण वनविभागाने गांगवन परिसराला बिबट्याच्या जाचातून लवकरात लवकर मुक्त करावे, अशी मागणी
ग्रामस्थ, पशुपालक, शेतमजूर यांनी केली आहे.
कळवण तालुक्यात जंगल वाढत असल्याकारणाने एकाच डोंगर रांगेतील गावात वावरणाऱ्या
सर्वाधिक बिबट्यांना पकडणे वनविभागापुढे मोठे आव्हान असून परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर बिबटे येतात तरी कुठून? कोण सोडतात हे बिबटे असा ग्रामस्थ व पशुपालकांचा प्रश्न आहे. बिबट्यांमुळे विसापूर बिटात सात वर्षांत ७० शेळ्या, शेकडो कोंबडे,
४० वासरे तर फिरस्तीवर
असणाऱ्या मेंढपाळांचे किती पशुधन मृत झाले याचा अंदाज नाही. पिळकोस, भादवण, विसापूर, गांगवन, पांढरीपाडा हा परिसर बिबट्याच्या दहशतीतून भयमुक्त करावा, अन्यथा परिस्थिती अशीच राहिल्यास परिसरातील पशुधन लवकरच
नष्ट होईल, असे पशुपालकांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Leopard in the Bhadavana area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.