नळवाडी शिवारात बिबट्या पिंजऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:12 AM2020-12-26T04:12:39+5:302020-12-26T04:12:39+5:30
भोजापूर खोरे परिसरातील नळवाडी शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला होता. नळवाडी-चास-चिकणी रस्त्यालगत पांढरी वस्तीलगत अर्जुन ...
भोजापूर खोरे परिसरातील नळवाडी शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला होता. नळवाडी-चास-चिकणी रस्त्यालगत पांढरी वस्तीलगत अर्जुन मुरलीधर दराडे यांची गट नंबर १५२ मध्ये शेतजमीन व वस्ती आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून या भागात बिबट्याचे वास्तव्य आहे. परिसरातील शेतकऱ्यांना अनेकदा रात्री-अपरात्री बिबट्याचे दर्शन झाल्याने दहशत निर्माण झाली होती. बिबट्याचा वावर वाढल्याने या भागात पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. पंधरा दिवसांपूर्वी येथे बिबट्या मादी जेरबंद झाली होती; परंतु बिबट्याचा या भागात मुक्तसंचार सुरू होता. उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहायक उपवनसंरक्षक ए. जे. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी पी. बी. सोनवणे, वनपरिमंडळ अधिकारी प्रीतेश सरोदे यांनी पाहणी करून या भागात पुन्हा पिंजरा लावला होता. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजऱ्यात सावज ठेवण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अलगद अडकल्याचे वनसेवक रामनाथ आगीवले, तुकाराम मेंगाळ, भगवान जाधव आदीसह शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. जेरबंद बिबट्या मादी ही शरीराने सुदृढ असून, अंदाजे एक ते दीड वर्षाची आहे. सिन्नर येथील वन उद्यानात तिची रवानगी केली असून, पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तपासणी केली असल्याची माहिती वनपरिमंडळ अधिकारी सरोदे यांनी दिली. दरम्यान, मंगळवारी धुळवड शिवारात बिबट्या जेरबंद झाला आहे. त्यामुळे गेल्या १५ दिवसांत भोजापूर व दापूर परिसरात तीन बिबटे जेरबंद झाले आहेत.
------------
फोटो ओळी : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील नळवाडी शिवारात जेरबंद झालेला बिबट्या. (२५ सिन्नर २)
===Photopath===
251220\25nsk_17_25122020_13.jpg
===Caption===
२५ सिन्नर २