वाहनाच्या धडकेत बिबट्याचे बछडे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 01:10 IST2021-03-03T22:19:50+5:302021-03-04T01:10:40+5:30
निफाड : तालुक्यातील नैताळेजवळ नाशिक-औरंगाबाद रोडवर मंगळवारी (दि.२) रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचे बछडे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

वाहनाच्या धडकेत बिबट्याचे बछडे जखमी
निफाड : तालुक्यातील नैताळेजवळ नाशिक-औरंगाबाद रोडवर मंगळवारी (दि.२) रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचे बछडे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास विंचूरकडून निफाडकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने नैताळजवळ नाशिक-औरंगाबाद रोडवर दीड वर्ष वयाच्या मादी बिबट्याला धडक दिल्याने सदर बछडे रस्त्याच्या कडेला फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी नैताळेचे पोलीस पाटील नवनाथ बोरगुडे यांनी सदर घटनेची खबर दिल्यानंतर त्यांनी वनविभागाला कळविले.
त्यानंतर वनरक्षक सुनील महाले, वनमजूर भारत माळी, विजय माळी आदींचे पथक तातडीने रात्री ११ वाजता घटनास्थळी पोहोचले. या पथकाने निरीक्षण केले असता सदर बिबट्याचे बछडे गंभीर अवस्थेत पडल्याचे आढळून आले. त्यांनी या बछड्याला पिंजऱ्यात टाकण्यात येऊन वनविभागाच्या वाहनाने निफाड येथे रोपवाटिका केंद्रात नेण्यात आले. या केंद्रात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चांदोरे यांनी जखमी बिबट्याच्या बछड्यावर उपचार केले. सद्या सदर बछडा वनविभागाच्या देखरेखीखाली आहे.