पाथर्डीला बिबट्या जेरबंद; लागोपाठ दोन बिबटे पिंजऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 08:58 PM2021-01-09T20:58:08+5:302021-01-09T21:01:59+5:30
बिबट्याच्या दहशतीच्या सावटाखाली येथील शेतकरी, शेतमजूरांना शेतीची कामे करावी लागत होती. पहाटे तसेच संध्याकाळी बिबट्याचे या भागात दर्शन घडत होते.
नाशिक : पाथर्डी शिवारातील मळे भागात बिबट्याचा मुक्त संचाराची तक्रार नाशिक पश्चिम वनविभागाला प्राप्त झाली होती. यानुसार येथील एका मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात शनिवारी (दि.९) बिबट्या (मादी) जेरबंद झाला. दोन दिवसांत हा दुसरा बिबट्या पिंजऱ्यात आला आहे.
पाथर्डी येथील नितीन डेमसे यांच्या गट क्रमांक१८४ मध्ये वनविभागाने बिबट्याच्या वावराच्या पाउलखुणांवरुन पिंजरा तैनात केला होता. या पिंजऱ्यात सुमारे आठवडाभरापासून बिबट्या जेरबंद होण्याची प्रतीक्षा पाथर्डी शिवाराच्या मळे भागातील शेतकरी वर्ग करीत होता. कारण या भागात बिबट्याचा मुक्त वावराने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. बिबट्याच्या दहशतीच्या सावटाखाली येथील शेतकरी, शेतमजूरांना शेतीची कामे करावी लागत होती. पहाटे तसेच संध्याकाळी बिबट्याचे या भागात दर्शन घडत होते. शनिवारी पहाटे (दि.९) अखेर पिंजऱ्यात बिबट्या अडकला आणि पाथर्डी शिवारातील मळे भागात राहणाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.
सकाळच्या सुमारास येथील शेतकऱ्यांना पिंजऱ्यातून बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आल्याने तत्काळ नागरिकांनी वनविभागाला माहिती कळविली. माहिती मिळताच वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक विजयसिंग पाटील, नाना जगताप, वाहनचालक प्रवीण राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. जेरबंद झालेला बिबट्याचा पिंजरा स्थानिक नागरिकांच्या मदतीने वन्यप्राणी वाहतुक वाहनात टाकून सुरक्षितरित्या तेथून वनविभागाच्या शहराबाहेरील रोपवाटिकेच्या दिशेने हलविला. पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्या हा सुमारे तीन ते चार वर्षे वयाची मादी असल्याचे वनविभागाच्या सुत्रांनी सांगितले. या बिबट्याला जिल्ह्याबाहेरील जंगलात रविवारी सोडले जाणार असल्याचे समजते.
--