धारणगाव वीर येथे बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:17 AM2021-02-25T04:17:50+5:302021-02-25T04:17:50+5:30
गेल्या आठवडाभरापासून ह्या परिसरात बिबट्यांची दहशत वाढलेली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर, तसेच व्यवसायावर त्याचा परिणाम होत असून, सर्वत्र ...
गेल्या आठवडाभरापासून ह्या परिसरात बिबट्यांची दहशत वाढलेली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर, तसेच व्यवसायावर त्याचा परिणाम होत असून, सर्वत्र भीतीचे सावट पसरलेले आहे. त्यातच वीज वितरण कंपनीकडून शेतीसाठी रात्रीचा वीजपुरवठा होतो. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी रात्री-अपरात्री जावे लागते. त्यातच परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांच्या जिवावर बेतण्यासारखे आहे.
या संदर्भात परिसरातील नागरिकांनी ओरड करताच वनखात्याने परिसरात मंगळवारी (दि. २३) पिंजरा लावला असता बुधवारी (दि. २४) सकाळी एक बिबट्या या पिंजऱ्यात अडकला.
बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अशक्य होत आहे. अजूनही परिसरामध्ये किती बिबटे आहेत याची माहिती नसल्याने नागरिकांमध्ये याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच वीजपुरठा दिवसाचा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पिंजऱ्यात अडकलेला बिबट्यास वन विभागाचे अधिकारी महाले व शेख ह्यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल गंभीरे, राहुल गंभीरे, महेश गंभीरे, संजय गंभीरे, अजय गंभीरे, मन्सूर शेख, ॠषीकेश गंभीरे, स्वप्निल गंभीरे, आदी ग्रामस्थांच्या सहकार्याने वनविभागाकडे पाठविण्यात आले. (२४ खेडलझुंगे, १, २)