गांधीनगरला बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:14 AM2021-04-15T04:14:10+5:302021-04-15T04:14:10+5:30
_______ नाशिक शहरालगतच्या गावांमध्ये बिबट्यांचा वाढता संचार पुन्हा एकदा दिसून येत आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील गांधीनगर येथील कॉम्बट आर्मी एव्हिएशन ...
_______
नाशिक शहरालगतच्या गावांमध्ये बिबट्यांचा वाढता संचार पुन्हा एकदा दिसून येत आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील गांधीनगर येथील कॉम्बट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट) आवारात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बुधवारी (दि.१४) पहाटे पूर्ण वाढ झालेला बिबट्या जेरबंद झाला.
गांधीनगर येथे लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचे प्रशिक्षण देणा-या एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या आवारात असलेल्या जंगलामध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार आढळून येत होता. येथील धावपट्टीजवळ रात्रीच्या सुमारास बिबट्या फिरत असल्याचेही जवानांना आढळून आले होते. यामुळे प्रशिक्षण केंद्र प्रशासनाच्या वतीने वनविभागाकडे या भागात पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली होती. पश्चिम वनविभागाच्या नाशिक परिक्षेत्रांतर्गत वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांच्या आदेशान्वये आठवडाभरापूर्वी पिंजरा तैनात करण्यात आला होता. वनरक्षक उत्तम पाटील यांच्या देखरेखीखाली पिंजऱ्यात भक्ष्य ठेवणे तसेच त्याची वेळोवेळी जाऊन तपासणी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. बिबट्या रात्रीच्या वेळेस पिंजऱ्याजवळून अनेकदा फेरफटका मारून पसार होत होता. मात्र, पिंजऱ्यात जात नव्हता. बुधवारी पहाटेच्या सुमारास पाच वर्षे वयाचा पूर्ण वाढ झालेला बिबट्या (नर) पिंजऱ्यात अडकला. घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू वाहनासह सकाळी पाटील यांनी प्रशिक्षण केंद्र गाठले. पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची खात्री करून तत्काळ पिंजरा सुरक्षितरीत्या तेथून हलविला. बिबट्या जेरबंद झाल्याने या केंद्रात लष्करी लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी जवानांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
____
फोटो nsk वर सेंड केलेला आहे।