पिंपळगाव बहुला येथे बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:13 AM2021-04-18T04:13:28+5:302021-04-18T04:13:28+5:30
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे बिबट्या भक्ष्य व पाण्याच्या शोधात शहरालगतच्या लोकवस्तीच्या आजूबाजूला दर्शन देऊ लागला आहे. यामुळे नागरिकांनी सावध ...
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे बिबट्या भक्ष्य व पाण्याच्या शोधात शहरालगतच्या लोकवस्तीच्या आजूबाजूला दर्शन देऊ लागला आहे. यामुळे नागरिकांनी सावध राहून रात्रीच्या वेळी एकटे शेताच्या परिसरात किंवा निर्जन ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे. विशेष करून आपल्याला लहान मुलांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. रात्रीच्या वेळेस लहान घराबाहेर खेळायला जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
मागील काही दिवसांपासून पिंपळगाव बहुला परिसरात बिबट्याचा मुक्त संचार नागरिकांना आढळून येत होता. संध्याकाळी तसेच रात्रीच्या सुमारास बहुतांश लोकांना बिबट्याने दर्शन दिले होते. तसेच पाळीव प्राण्यांवर व परिसरातील कुत्र्यांवर हल्ल्याच्या घटनाही आजूबाजूला घडल्या होत्या. यामुळे नागरिकांच्या मागणीवरून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शंकर विठोबा नागरे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात दीड ते दोन वर्षे वयाचा बिबट्या (नर) अडकला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पिंजरा ताब्यात घेऊन सुरक्षितरित्या हलविला. रोपवाटिकेत बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांच्या आदेशानुसार मध्यरात्री बिबट्याला नाशिक जिल्ह्याच्या बाहेर नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.