बिबट्याच्या दोन बछड्यांची ‘मातृभेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:11 AM2020-12-23T04:11:54+5:302020-12-23T04:11:54+5:30
सोमवारी (दि. २१) तालुक्यातील करंजी येथील काळू फकिरा अडसरे यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना कामगारांना बिबट्याचे दोन बछडे ...
सोमवारी (दि. २१) तालुक्यातील करंजी येथील काळू फकिरा अडसरे यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना कामगारांना बिबट्याचे दोन बछडे आढळून आले. हे बछडे अंदाजे १५ ते २० दिवसांचे आहेत. ही घटना अडसरे यांनी वनविभागाला कळवली. त्यानंतर तातडीने येवला वनविभागाच्या पथकाने करंजी येथे धाव घेत या बछड्यांना निफाड येथील वनविभागाच्या रोपवाटिका केंद्रात आणले. बछडे उसाच्या क्षेत्रात न दिसल्यास बछड्यांची माता व्याकूळ होईल, हिंसक होऊन जवळील नागरिकांवर हल्ला करू शकते, या कारणास्तव बछडे पुन्हा अडसरे यांच्या उसाच्या शेतात ठेवण्यात आले. दोन बछडे एका कॅरेटमध्ये ठेवून त्यावर लोखंडी जाळी ठेवण्यात आली. या जाळीला एक दोरी बांधण्यात आली व ही दोरी एका कर्मचाऱ्याच्या हातात दूर अंतरावर देण्यात आली. विशेष म्हणजे वरील वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचे पथक घटनास्थळापासून १०० मीटर अंतरावर वनविभागाच्या वाहनांमध्ये बसून होते व उच्च क्षमतेच्या नाइट मोड कॅमेऱ्यातून बछडे ठेवलेल्या घटनास्थळाचे निरीक्षण करीत होते. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. बछड्यांच्या ओढीने व्याकूळ झालेली बिबट्याची मादी बछड्यांजवळ आली. यावेळी जाळी लावलेल्या कॅरेटमधून बछड्यांचा व्याकूळ आवाज ऐकून ही मादी कॅरेटजवळ गेल्यानंतर तातडीने जाळीची दोरी खेचून बछड्यास मोकळे करण्यात आले. बछडे पाहून धावतच मादी बिबट्या बछड्याजवळ गेली व दोन्ही बछड्यांना काही अंतराच्या फरकाने घेऊन निघून गेली. यातील एक बछडा नर तर दुसरा मादी आहे.