बिबट्याची वडनेर रस्त्यावर झेप; हेल्मेटमुळे वाचला दुचाकीस्वाराचा जीव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 04:27 PM2018-02-06T16:27:20+5:302018-02-06T16:29:58+5:30
घटनेची माहिती समजताच वनविभागाचे वन परिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार हे वनरक्षकांसोबत तातडीने पिंपळगाव खांब परिसरात दाखल झाले. रात्रीच्या अंधारात परिसरात काही तास शोधमोहिमही राबविण्याचा प्रयत्न क रण्यात आला.
नाशिक : पाथर्डी-वडनेर रस्त्यावरुन रात्रीच्या सुमारास नाशिकरोडकडून दुचाकीने जात असलेला एक दुचाकीस्वार बिबट्याच्या झेपमुळे जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.५) रात्रीच्या सुमारास घडली.
वडनेररोडवरुन पिंपळगाव खांबच्या शिवारात एका रोपवाटिकेच्या परिसरातून बिबट्याने अचानकपणे रस्त्याच्या दिशेला झेप घेतली. यावेळी दुचाकीवरुन (एम.एच.०२ सीयू ४७७१) प्रवास करणारे आयुर्वेद चिकित्सक संजीव कुमावत बिबट्याला बघून घाबरून खाली कोसळले. सुदैवाने त्यांनी हेल्मेट परिधान केलेले असल्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला नाही व बिबट्यानेही त्यांच्यावर पुन्हा चाल करण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे ते बालंबाल बचावले; मात्र बिबट्या रस्त्यावर आल्यानंतर पाथर्डीच्या दिशेने मोठे चारचाकी वाहन जवळ आल्याने वाहनाच्या प्रकाशाने बिथरलेल्या बिबट्याने पुन्हा येथील मळे परिसरात धूम ठोकली. एकूणच बिबट्याची रस्त्यावरुन झेप घेण्याची वेळ आणि कुमावत तेथून मार्गस्थ होण्याची वेळ एक झाल्याने त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व ते खाली पडल्याची माहिती वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार यांनी दिली आहे.
घटनेची माहिती समजताच वनविभागाचे वन परिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार हे वनरक्षकांसोबत तातडीने पिंपळगाव खांब परिसरात दाखल झाले. रात्रीच्या अंधारात परिसरात काही तास शोधमोहिमही राबविण्याचा प्रयत्न क रण्यात आला. तसेच मंगळवारी (दि.६) वनविभागाचे कर्मचारी पुन्हा या भागात पोहचले. यावेळी परिसरातील काही मळ्यांच्या वस्तीवर जाऊन कर्मचा-यांनी शेतक-यांशी संवाद साधत बिबट्या प्रत्यक्षरित्या नजरेस पडला का? याबाबत खात्री केली तसेच बिबट्याचा वावर असल्याचे नैसर्गिक पुरावेही शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र खात्रीलायक माहिती व पुरावे अद्याप मिळून आले नसून वनविभाग या परिसराकडे लक्ष ठेवून असल्याचे खैरनार म्हणाले.