तळवाडे येथे विहिरीत अडकलेल्या बिबट्याला जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 02:37 PM2018-09-30T14:37:56+5:302018-09-30T14:38:58+5:30
वन विभागाच्या प्रयत्नाने बिबट्याला बाहेर काढण्यात कर्मचाऱ्यांना यश आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
सायखेडा (नाशिक) - निफाड, सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील तळवाडे, महाजनपुर या दोन गावांच्या सीमेवर विठ्ल गवते यांच्या विहिरीत बिबटया पडल्याची घटना घडली. वन विभागाच्या प्रयत्नाने बिबट्याला बाहेर काढण्यात कर्मचाऱ्यांना यश आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
निफाड तालुक्यात महाजनपुर, तळवाडे, भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी हा गावं बिबट्याचे माहेरघर बनले असून एका महिन्यात महाजनपुर शिवारात एकाच ठिकाणी चार बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. असे असले तरी आणखी बिबटया असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी पाहिले होते. दहा दिवसांनंतर तळवाडे आणि महाजनपुर शिवारात बिबटया मध्यरात्रीच्या सुमारास गवते यांच्या विहिरीत पडल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले असता सरपंच लता सांगळे यांना कळविले. सांगळे यांनी वन विभागाचे अधिकारी भंडारे यांना याबाबत माहिती दिली. सकाळी 9 वाजेच्या सुमारास कर्मचारी पिंजऱ्यासह दाखल झाले आणि त्यांना अनेक प्रयत्न करून बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यास यश आले. बिबटया बाहेर येताच शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला वन विभागाने बिबटयाला निफाड जवळील रोपवाटिकेत घेऊन गेले. यावेळी वन विभागाचे अधिकारी संजय भंडारे, कर्मचारी टेकनर, शेख यासह महाजनपुरचे सरपंच आशा फड, राजेंद्र सांगळे,शेतकरी नागरिक उपस्थित होते.
ओसाड माळरानाचा शिवार असूनही या ठिकाणी सातत्याने बिबटया येतो. एकाच ठिकाणी चार बिबटे पकडल्याची घटना ताजी असतानाच जवळच असलेल्या विहिरीत बिबटया पडल्याने या परिसरात आणखी किती बिबटे असण्याची शक्यता आहे. बिबटयाला लपण्यासाठी कोणतही अनुकूल वातावरण नसताना बिबटया या परिसरात वारंवार का येतो की पकडलेले बिबटे परत या भागात सोडले जातात.
-लता सांगळे, सरपंच, तळवाडे