चाडेगाव शिवारात बिबट्याची मादी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 01:19 AM2019-07-22T01:19:20+5:302019-07-22T01:19:41+5:30
परिसरातील महापालिका हद्दीतील चाडेगाव शिवारात शनिवारी (दि.२०) रात्रीच्या सुमारास चार वर्षे वयाची बिबट्याची मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली. गेल्याच आठवड्यात याच शिवारात नर जातीचा बिबट्या पिंजºयात जेरबंद झाला होता.
एकलहरे : परिसरातील महापालिका हद्दीतील चाडेगाव शिवारात शनिवारी (दि.२०) रात्रीच्या सुमारास चार वर्षे वयाची बिबट्याची मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली. गेल्याच आठवड्यात याच शिवारात नर जातीचा बिबट्या पिंजºयात जेरबंद झाला होता. या परिसरात अजून काही बिबटे असण्याची शक्यता गावकऱ्यांनी वर्तविली आहे.
गेल्या चार दिवसांपूर्वी चाडेगाव बसस्थानकाच्या बाजूला नागरिकांना बिबट्याचा दर्शन झाले होते. शनिवारी रात्री उशिरा बिबट्याची मादी पिंजºयात बंदिस्त झाल्याचे रविवारी (दि.२१) सकाळी नागरिकांच्या लक्षात आल्यावर वनविभागाला कळविण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोगे, वनपरिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी, वनरक्षक गोविंद पंढरे व सहकाºयांनी रेस्क्यू करून बिबट वन्यप्राण्यास ताब्यात घेतले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
गेल्या काही महिन्यांपासून सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेढे, एकलहरे, चाडेगाव परिसर बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहे. चाडेगाव, सामनगावरोड परिसरात बिबट्या पिंजºयात जेरबंद झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी बिबट्याला पाहाण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, एकलहरे गावाकडून मातोश्री कॉलेज व हिंगणवेढ्याकडे जाणाºया रस्त्यावर गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वी रात्री आठ वाजेच्या सुमारास साहेबराव खर्जुल, एकनाथ पवळे, अरु ण खर्जुल, संभाजी पवळे, भूषण खर्जुल, शुभम पवळे, वामनराव पवळे, बाळासाहेब कासार, चेतन पवळे यांना रात्री आठ वाजता बिबट्या आढळला. साहेबराव खर्जुल यांच्या उसातून अचानक बिबट्याने झेप घेऊन घरासमोरील पाळीव कुत्र्यावर हल्ला केला.
लोकांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून पलायन करून समोरच्या उसात शिरला. या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य असल्याने नागरिकांत भीती वातावरण आहे. येथे पिंजरा लावावा, अशी शेतकºयांची मागणी आहे.
हिंगणवेढ्यातही वास्तव्य
हिंगणवेढ्यात प्रकाश धात्रक यांच्या शेतात गेल्या महिन्यात बिबट्याने धुमाकूळ घालून चार कुत्र्यांचा फडशा पाडला होता. तेथे पिंजरा लावण्यात आला आहे, मात्र बिबट्या हुलकावणी देत आहे. यापूर्वी पिंजºयात अडकलेला बिबट्या वनविभागाने सुरक्षित ठिकाणी सोडून दिल्यावर तोच पुन्हा या भागात आला असावा, अशी चर्चा आहे.