बिबट्या धडकला दुचाकीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:23 AM2020-12-05T04:23:00+5:302020-12-05T04:23:00+5:30
विहितगाव, वडनेर रोड या ठिकाणापासून लष्करी हद्द अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने दररोज सांयकाळी, रात्रीच्या सुमारास या रस्त्यावर ...
विहितगाव, वडनेर रोड या ठिकाणापासून लष्करी हद्द अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने दररोज सांयकाळी, रात्रीच्या सुमारास या रस्त्यावर बिबट्यांचा वावर होत असतो. पंधरा दिवसांपूर्वीच अशाच प्रकारे एका बिबट्याने जवळच शेतात काम करणाऱ्या महिलांना दर्शन दिल्यामुळे या भागात वनविभागाने पिंजरा लावला होता व बिबट्या जेरबंद केला होता. त्यामुळे ग्रामस्थांनी काहीसा सुटकेचा नि:श्वास सोडला असताना या भागात आणखी दोन बिबटे व एक बछडा फिरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. या बिबट्यांना हांडोरे व पोरजे यांच्या पेरू व द्राक्षबागेत लपण्यासाठी जागा असल्याने ते हाती लागत नव्हते. गुरुवारी अशाच प्रकारे रात्री वडनेर दुमाला रस्त्याने दुचाकीवरून जात असलेल्या शेतकऱ्याच्या दुचाकीला बिबट्याने धडक दिली. यातून शेतकरी बालंबाल बचावला असला तरी, या घटनेने परिसरात पुन्हा घबराट निर्माण झाली आहे. या भागात पिंजरा लावावा, अशी मागणी उद्धव पोरजे व रामचंद्र पोरजे यांनी केली होती. त्यानुसार वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनरक्षक गोविंद पंढरे यांनी शुक्रवारी पिंजरा लावला आहे.