धावत्या दुचाकीवर बिबट्याची झडप, हल्ल्यात दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:14 AM2021-03-05T04:14:23+5:302021-03-05T04:14:23+5:30
सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून धावत्या दुचाकीवर बिबट्याने झडप घालून केलेल्या हल्ल्यात ...
सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून धावत्या दुचाकीवर बिबट्याने झडप घालून केलेल्या हल्ल्यात दोघेजण जखमी झाल्याची घटना पांढुर्ली शिवारात घडली. पांढुर्ली-आगासखिंड रस्त्यावर ही घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्यात नितीन सुरेश गाढवे (२७) व विकास ज्ञानेश्वर जाधव (३०) हे दोघे जखमी झाले. पांढुर्ली-आगासखिंड परिसरात बिबट्याने दुचाकीवर हल्ला करण्याची महिनाभरातील तिसरी घटना आहे. नितीन गाढवे व विकास जाधव हे दोघे हळदीच्या कार्यक्रमाला गेले होते. तेथून ते रात्री साडेअकराच्या सुमारास समृद्धी महामार्गाकडून घरी परतत असताना जुना आगासखिंड - पांढुर्ली रस्त्याच्या कडेला असलेल्या वाजे यांच्या गव्हाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवर पाठीमागून झडप घातली. चालक गाढवे यांचा डावा पाय जबड्यात पकडल्याने त्यांनी प्रसंगावधान राखत दुचाकीचा वेग वाढवल्याने बिबट्याच्या जबड्यातून त्यांचा पाय निसटला. मात्र बिबट्याने त्यांचा पुन्हा पाठलाग करत पाठीमागे बसलेल्या विकास जाधव यांच्या पाठीवर पंजा मारला. त्यामुळे तोही जखमी झाला. दरम्यान त्यांनी दुचाकीचा वेग कायम ठेवत जखमी अवस्थेतच पाचशे मीटरवर असलेले घर गाठले. घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी या परिसरात पिंजरा लावण्यात आला.
---------------------------
महिनाभरापूर्वी आगासखिंड येथील संदीप पुंजा आरोटे हे कबड्डी स्पर्धा बघून आपल्या घरी दुचाकीने जात असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला करत जखमी केले होते. यामध्ये आरोटे यांच्या हातावर गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यानंतर पंधरा दिवसातच तृप्ती तांबे व यश वाजे या शाळकरी विद्यार्थ्यांच्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला करून त्यांना जखमी केले होते. त्यामुळे महिनाभरात बिबट्याने दुचाकीवर हल्ला केल्याची तिसरी घटना घडली असून यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.