पाण्याच्या शोधातील बिबट्या पडला विहिरीत, वनविभागाची धाव अन् सुटका
By धनंजय वाखारे | Published: September 21, 2023 05:05 PM2023-09-21T17:05:11+5:302023-09-21T17:13:59+5:30
नाशिक जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या घटना
सचिन सांगळे
नांदूरशिंगोटे (नाशिक) : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी विहिरीत पडलेल्या बिबट्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास वनविभागाला यश आले. सिन्नर तालुक्यातील कासारवाडी भागात भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडल्याची घटना बुधवारी (दि. २०) रात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने विहिरीला पाणी नसल्याने बिबट्याने कपारीचा आधार घेत संपूर्ण रात्र विहिरीत काढली.
गुरुवारी (दि.२१) दुपारी वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन करत क्रेनच्या साहाय्याने बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढत जेरबंद केले. भागवत सीताराम साळुंखे यांच्या शेतजमिनीत ७० ते ८० फूट जुनी पडकी विहीर असून विहिरीच्या भोवतालीच गाजर गवताचा वेढा पडलेला आहे. भोजापूर परिसरात पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्याने या विहिरीच्या केवळ तळालाच पाणी साचलेले होते. परिसरात ऊस व मकाचे क्षेत्र आहे. त्यामुळे याठिकाणी बिबट्यांचा संचार असतो. बुधवारी रात्रीच्या वेळी विहिरीचा अंदाज न आल्याने बिबट्या थेट पाण्यात पडला. रात्रभर कपारीचा आश्रय घेतलेला बिबट्या सकाळी निदर्शनास आल्यानंतर वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबविले, तर दुसऱ्या घटनेत येवला तालुक्यातील विसापूर येथे साठ फूट विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वन विभागाला यश आले.
नाशिक - सिन्नर तालुक्यातील कासारवाडी येथे पाण्याच्या शोधातील बिबट्या पडला विहिरीत, वनविभागाकडून सुटका pic.twitter.com/oqQGMK63fg
— Lokmat (@lokmat) September 21, 2023
दरम्यान, गुरुवारी (दि.२१) विसापूर येथील शेतकरी संतोष सीताराम सोनवणे यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन करीत जाळीच्या साहाय्याने बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले. त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.