बिबट्याने पाडला पाच शेळ्यांचा फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:13 AM2021-01-22T04:13:29+5:302021-01-22T04:13:29+5:30
सिन्नर : तालुक्यातील उजनी शिवारात गोठ्यामध्ये बांधलेल्या शेळ्यांवर गुरुवारी (दि. २१) पहाटे बिबट्याने हल्ला करून पाच शेळ्यांचा फडशा पाडला. ...
सिन्नर : तालुक्यातील उजनी शिवारात गोठ्यामध्ये बांधलेल्या शेळ्यांवर गुरुवारी (दि. २१) पहाटे बिबट्याने हल्ला करून पाच शेळ्यांचा फडशा पाडला. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून, वनविभागाने या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
उजनी येथील वत्सलाबाई सोपान जाधव यांच्या शेत गट क्रमांक २२६ मध्ये राहत्या घराशेजारी बकऱ्यांचा गोठा आहे. पहाटे बिबट्याने गोठ्याची जाळी तोडून आत प्रवेश केला. गोठ्यात बांधलेल्या पाच शेळ्यांचा बिबट्याने फडशा पाडला. या अगोदरही पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याने एक शेळी ओढून नेण्याची घटना घडली होती. या महिलेच्या सहा शेळ्या बिबट्याने ठार केल्याने महिला शेतकऱ्याचे सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वीच बिबट्याने एका शेळीचा फडशा पाडला, तेव्हा वनविभागाकडे तक्रार करण्यात आली होती. वनमजूर मधुकर शिंदे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली होती. त्याचवेळी या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, वनविभागाने दुर्लक्ष केल्याने आणखी पाच शेळ्यांचा बळी गेल्याची तक्रार वत्सलाबाई जाधव यांनी केली आहे. या घटनेतून तरी वनविभागाने सावध होऊन या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.