नाशिक-मुंबई महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

By अझहर शेख | Published: November 19, 2022 12:15 AM2022-11-19T00:15:59+5:302022-11-19T00:16:14+5:30

मुंबई महामार्गावर गौळाणे, रायगडनगर, वाडीवऱ्हे या शिवारात महामार्गावर बिबट्याचा रात्री संचार असतो.

Leopard killed in Accident on Nashik-Mumbai highway | नाशिक-मुंबई महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

नाशिक-मुंबई महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

googlenewsNext

नाशिक - मुंबई-आग्रा महामार्गावर वाडीवऱ्हेजवळ शुक्रवारी (दि.18) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडकेत बिबट्याची साडे तीन वर्षांची मादी गंभीर जखमी झाली. वनविभागाच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी दाखल होत जखमी बिबट्याला सुरक्षित पिंजऱ्यात घेत उपचारासाठी हलविले. तासाभरात उपचारादरम्यान मादीचा मृत्यु झाल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मुंबई महामार्गावर गौळाणे, रायगडनगर, वाडीवऱ्हे या शिवारात महामार्गावर बिबट्याचा रात्री संचार असतो. या परिसरात बिबट्याचा अधिवास असून हा संपूर्ण भाग कॉरिडोर आहे. या भागात नेहमीच बिबट्यांना वाहनांची धडक बसते. या ठिकाणी बहुसंख्य बिबटे अपघाती मृत्युमुखी पडले आहेत. बिबट्यांसाठी हा 10-15 किलोमीटर चा परिसर 'ब्लॅक स्पॉट' बनला आहे.

शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास बिबट्या मादी येथूनच रस्ता ओलांडून नैसर्गिक अधिवासात जात असताना भरधाव वाहनाने धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बिबट्या मुख्य रस्त्यावरून थेट दुभाजकावरील झाडीत फेकला गेला होता, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बिबट्या जखमी झाल्याचे काही लोकांच्या लक्षत आल्यानंतर त्यांनी जवळ जाऊन बघितले असता त्याची हालचाल दिसून आली. तातडीने याबाबत माहिती  वाडीवऱ्हे पोलीस आणि वनविभागाला जागरूक नागरिकांनी कळविली. घटनेची माहिती मिळताच नाशिक, इगतपुरी वनपरिक्षेत्राचे आधिकारी, कर्मचारी यांचे रेस्क्यू पथक, मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले, इको-एको वन्यजीवप्रेमी संस्थेचे स्वयंसेवक घटनास्थळी पोहचले. तातडीने अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत बिबट्याला पिंजऱ्यात सुरक्षित टाकण्यात आले. पिंजर वन्यजीव रेस्क्यू वाहनातून नाशिकला औषधोपचारासाठी हलविण्यात आले. पशुवैद्यकीय चमूकडून रात्री साडे नऊ वाजेपर्यंत जखमी बिबट्यावर गंगापूरच्या रोपवाटिकत उपचार सुरू होते; मात्र उपचारादरम्यान बिबट्या मादीने अखेर प्राण सोडले.

Web Title: Leopard killed in Accident on Nashik-Mumbai highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.