कुंदेवाडी शिवारात बिबट्याचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 06:00 PM2018-10-20T18:00:48+5:302018-10-20T18:02:47+5:30
कुंदेवाडी येथील कुंदे यांच्या डेअरी फार्म परिसरात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याच्या जोडीचा वावर वाढला आहे. बिबट्यांनी गेल्या काही दिवसात कुत्र्यांना फस्त केल्याने शेतकरी धास्तावले आहेत. वनविभागाने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी परिसरात दोन पिंजरे लावले आहेत.
सिन्नर : शहरानजीक असलेल्या कुंदेवाडी येथील कुंदे यांच्या डेअरी फार्म परिसरात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याच्या जोडीचा वावर वाढला आहे. बिबट्यांनी गेल्या काही दिवसात कुत्र्यांना फस्त केल्याने शेतकरी धास्तावले आहेत. वनविभागाने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी परिसरात दोन पिंजरे लावले आहेत.
कुंदेवाडी शिवारात शिर्डी बायपासच्या जवळ गेल्या आठ दिवसांपासून या दोन बिबट्यांचा वावर आहे. राखणदार शेतकऱ्यांना ही जोडी वारंवार नजरेस पडत असल्याने त्यांची पाचावरच धारण बसली आहे. वनविभागास कळविल्यानंतर या परिसरात बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरेही लावण्यात आले. मात्र, बिबटे पिंजºयात येण्याऐवजी दररोज कुत्र्यांना भक्ष्य करीत असल्याने येथील शेतकरी धास्तावले आहे.
दरम्यान, चिंचोली येथे बिबट्याचे दर्शन झाल्याने येथील एक पिंजरा तिकडे स्थलांतरित करण्यात आला आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी कुंदेवाडी परिसरातून होत आहे.