देवळाली कॅम्प भागात बिबट्याचा संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:18 AM2021-07-14T04:18:18+5:302021-07-14T04:18:18+5:30
गेल्या आठवड्यापासून दोनवाडे शिवारात सातत्याने बिबट्यांचा वावर दिसून आला आहे. रात्रीच्या सुमारास या बिबट्यांनी पाळीव प्राणी व कुत्र्यांना आपल्या ...
गेल्या आठवड्यापासून दोनवाडे शिवारात सातत्याने बिबट्यांचा वावर दिसून आला आहे. रात्रीच्या सुमारास या बिबट्यांनी पाळीव प्राणी व कुत्र्यांना आपल्या भक्ष्य केले आहे. मागील आठवड्यात शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान शेतकऱ्यांना एकाच वेळी तीन बिबट्यांनी दर्शन दिले होते. यानंतर कांगनेे यांच्या ऊसशेतीजवळ दोन दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता या पिंजऱ्यामध्ये पहाटेच्या सुमारास चारवर्षीय बिबट्या (नर) जेरबंद झाल्याने काहीसा दिलासा मिळाला.
रेस्टरोडवरील कासार मळ्यात पहाटेच्या सुमारास रहिवासी चंद्रकांत कासार यांच्या घरामागे बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करत त्याला ठार केले. ही घटना कासार यांनी आपल्या घरामागे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबतची माहिती वनविभागाला कळविण्यात आल्यानंतर वनरक्षकांनी घटनास्थळी येऊन परिसरात बिबट्याच्या पाऊलखुणांचा शोध घेत पिंजरा लावण्यास सकारात्मकता दर्शविली.
लॅमरोडवरील हरमोनी सोसायटीत दोन दिवसांपूर्वी बिबट्याचे दर्शन झाल्याचे सुरक्षा रक्षकाने सांगितले. तीन महिन्यांपूर्वी याच परिसरातून बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला होता.