बिबट्याला गरज सुरक्षित अधिवासाची !
By किरण अग्रवाल | Published: December 2, 2018 12:36 AM2018-12-02T00:36:02+5:302018-12-02T00:38:32+5:30
जिल्ह्यात बिबट्याच्या दहशतीने अनेकजण धास्तावले आहेत. वनविभागाकडेही यंत्रणा अपुरी आहे. याबाबत मूलगामी विचार गरजेचा आहे. भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत येणाºया बिबट्यांना सुरक्षित अधिवास लाभल्यास त्यांचा जीवही वाचेल व ग्रामस्थांचे भयही दूर होईल. त्याकरिता शासन स्तरावरच प्रयत्न होणे अपेक्षित आहे.
सारांश
भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीकडे झेपावणाºया बिबट्यांमुळे जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, बिबट्या व मानवाच्या संघर्षात या प्राण्याला जीव गमवावा लागत असल्याच्याही घटना वाढल्या आहेत. त्यामुळे बिबट्यांपासून बचावाचा विचार करताना त्याला सुरक्षित अधिवास उपलब्ध करून देण्याबरोबरच संबंधित परिसरात त्याच्या सवयी व उपद्रवापासून बचावाबाबतचे जनजागरण होणे गरजेचे ठरले आहे.
बिबट्याचा वावर, त्याचे हल्ले व नागरिकांकडून भीतीपोटी होणारे रात्रीचे जागरण आदी प्रकार अलीकडे वाढले आहेत. गोदाकाठच्या ऊस लागवड क्षेत्रात आजवर बिबटे अधिक आढळत; परंतु आता देवळाली कॅम्प, सिन्नर, इगतपुरी परिसरातही त्याच्या पाऊलखुणा आढळून येत आहेत. कसारा घाट, घाटनदेवीचा वनसंपदेने भरलेला परिसर तसेच जिल्ह्यातील नद्यांचे खोरे व सह्याद्रीच्या पर्वतरांगा यामुळे बिबट्यांचा अधिवास नाशिक जिल्ह्यात वाढला आहे. त्यामुळेच दररोज कुठे ना कुठे बिबट्याच्या वावराचे वा त्याने कोंबडी, बकरी आदी पाळीव प्राणी फस्त केल्याचे प्रकार घडत असल्याने शेती, वस्तीवर राहणाºया ग्रामस्थांची झोप उडाली आहे. बिबट्यांच्या या दहशतीतून मुक्तता व्हावी म्हणून ठिकठिकाणच्या ग्रामस्थांनी वनविभागाकडे निवेदने वगैरे दिली आहेत; परंतु या खात्याकडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ व बिबट्याकडून होणाºया हल्ल्याच्या घटना यांचा मेळ बसू शकत नाही, अशी स्थिती आहे. बरे, बिबट्या हा एका जागी न थांबणारा प्राणी आहे. त्यामुळे आज अमुक ठिकाणी दिसला म्हणून तिथे पिंजरा लावला तर पुन्हा तो त्याच ठिकाणी येईल याची शाश्वती नसते. शिवाय, पिंजरेही कुठे कुठे आणि किती लावणार असाही प्रश्न आहेच. म्हणजे एक तर मनुष्यबळाची टंचाई व त्यात साधन-सामग्रीची चणचण अशा अवस्थेत वनविभागाचे कामकाज सुरू आहे. निफाड तालुक्याच्या ऊस लागवड क्षेत्रात बिबट्यांचा संचार मोठ्या प्रमाणात असल्याने तेथे वनविभागाचे स्वतंत्र परिक्षेत्र व्हावे व त्यात प्रशिक्षित कर्मचाºयांची नियुक्ती करावी, अशी मागणी आहे; परंतु नाशकातच नाही तर निफाडमध्ये कोठून व्यवस्था पुरवणार, अशी त्या विभागापुढील समस्या आहे.
महत्त्वाचे म्हणजे, बिबट्याचा मनुष्यावरील व पाळीव प्राण्यांवरील हल्ला आणि त्याची मानव वस्तीवरील दहशत या एकाच बाजूने त्याकडे पाहिले जाते. परंतु ज्याप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातील नरभक्षक अवनी वाघिणीला मारल्याबद्दल वन्यजीव-प्रेमींनी सरकारवर आगपाखड केल्याचे व मनेका गांधी यांनीही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सुनावल्याचे दिसून आले, तसे बिबट्यांच्या बाबत होताना दिसत नाही. वस्तुत: बिबट्या हा जैवविविधतेतील नैसर्गिक अन्नशृंखलेतील अत्युच्चपदी असलेल्या मार्जार कुळातील प्राणी आहे. या कुळातील पट्टेदार वाघ, सिंह किंवा चित्ता यांच्याबाबत जशी काळजी घेतली जाते तशी बिबट्याबाबत घेतली जात नाही. चित्ता तर आता महाराष्ट्रात आढळतच नाही. वाघ वाचविण्यासाठी खास मोहीम चालविली जाते. परंतु बिबटे रस्ता अपघातात मारले जात आहेत, त्याबद्दल कुणाला हळहळ वाटत नाही. वनविभागाकडूनच प्राप्त आकडेवारीनुसार गेल्या ७ वर्षात नाशिक विभागातच तब्बल २३३ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असलेल्या संगमनेर उपविभागात सर्वाधिक ९१ बिबटे मृत्युमुखी पडले आहेत. गेल्या तीन वर्षांचा आढावा घेता नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वाधिक म्हणजे ११ बिबटे रस्ते अपघातात बळी पडले आहेत. वर्षाकाठी सुमारे ३३ बिबट्यांचा मृत्यू, असे हे प्रमाण आहे. त्यामुळे बिबट्यांचा उपद्रव हा चिंतेचा विषय असला, तरी त्यांची वाढती संख्या ही शुभवर्तमानाचीही बाब मानली जात असताना या प्राण्याच्या सुरक्षित अधिवासाबाबत गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचेच दिसून येणारे आहे.
यातील दखल घेण्यासारखा मुद्दा असा की, आजवर नाशिक जिल्ह्यात बिबट्याच्या शिकारीची एकही घटना अधिकृतपणे नोंदविली गेलेली नव्हती; परंतु यावर्षी एका बिबट्याची शिकारकेली गेल्याचे उघडकीस आल्याने शिकाºयांपासून बिबट्यांचा बचाव करण्याची नवीनच जबाबदारी वनविभागावर आली आहे. वन्यप्राण्यांच्या कातडी, नखाची तस्करी करणाºयांचे जाळे यानिमित्ताने नाशिक जिल्ह्यात पाय रोवणार असेल तर ती धोक्याचीच सूचना ठरावी. तेव्हा, ‘वाघ वाचवा’ मोहिमेप्रमाणेच बिबटे बचावचीही गरज आहे. त्यासाठी सुरक्षित अधिवासाची व्यवस्था होणे अपेक्षित आहे. आता तेच होत नाहीये. शिवाय, बिबट्यांच्या भक्ष्याची पुरेसी व्यवस्था नसल्याने ते मानवी वस्तीकडे चाल करून येत असतात. मानवी वस्तीत येणाºया बिबट्यांच्या भयापासून मुक्तीसाठी वाइल्डलाइफ कान्झर्वेशन सोसायटीच्या माध्यमातून ‘जाणता वाघोबा’सारखे अभियान हाती घेण्यात आले आहे. ते निफाड तालुक्यात राबविलेही गेले; परंतु बिबट्याच्या वावराची व्याप्ती पाहता अन्यत्रही त्याबाबत जनजागरण होणे गरजेचे आहे. शिवाय, जिल्ह्यातील निसर्गसंपदा लक्षात घेता खास बिबट्यांच्या सुरक्षित अधिवासासाठी ‘बिबट्या सफारी’सारखा प्रकल्प हाती घेता येऊ शकेल. अर्थात, त्यासाठी वन्यजिवांबद्दलची आस्था असणे अपेक्षित आहे. चतुर, चपळ व बुद्धिमानतेमुळे वाघवनातील अभिमन्यू मानल्या जाणाºया बिबट्यापुढे आज स्व-रक्षणाचेच संकट असल्याने हा ‘सफारी’ प्रोजेक्ट नक्कीच उपयोगी ठरू शकेल. त्यामुळे बिबट्यांचा अधिवास सुरक्षित ठरून मनुष्याला होणारा उपद्रवही आटोक्यात येऊ शकेल.