बिबट्याची दहशत : सुरक्षेसाठी पळसेच्या ग्रामस्थांनी घरांभोवती केले चक्क ‘फेन्सिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 02:24 PM2020-07-13T14:24:40+5:302020-07-13T14:27:06+5:30
या घटनेनंतर ऊसशेतीच्या जवळ राहणाऱ्या पळसेतील काही कुटुंबांनी चक्क आपल्या घरांभोवती जाळीचे ‘चेनलिंक फेन्सिंग’ करून घेतले आहे.
नाशिक :नाशिक तालुक्याच्या पुर्व भागात दारणा नदीच्या काठालगतच्या गावांमध्ये मागील दोन महिन्यांपासून बिबट्यांचा मुक्त संचार सुरू आहे. मागील पंधरवड्यात दोन बिबटे जेरबंद करण्यास वनविभागाला यश आल्याने काही प्रमाणात दारणाकाठावरील भय कमी होण्यास मदत झाली. पळसे गावातसुध्दा एका चिमुकलीवर बिबट्याने थेट अंगणात येऊन हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर ऊसशेतीच्या जवळ राहणाऱ्या पळसेतील काही कुटुंबांनी चक्क आपल्या घरांभोवती जाळीचे ‘चेनलिंक फेन्सिंग’ करून घेतले आहे.
दारणा नदीच्या काठालगत शेवगेदारणा, पळसे ही गावे जवळजवळ आहे. भगूरजवळील दोनवाडे ते थेट बाभळेश्वरपर्यंत अन् सामनगाव ते कोटमगावपर्यंत बिबट्याने दहशत माजविली. दीड ते दोन महिन्यांत दारणाकाठालगत तीन चिमुकल्यांसह एका वृध्दाला बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला आहे. तसेच पळसेत समृध्दी कासार तर सामनगावात ओम कडभाने या चिमुकल्यांचे दैव बलवत्तर म्हणून ते बिबट्याच्या जबड्यातून निसटले.
पळसे ग्रामपंचायतीपासून काही अंतरावर असलेल्या शेवगेदारणा रस्त्यावरील टेंभी मळ्यातील ऊसशेतीतसुध्दा भरदिवसा बिबट्याचा संचार शेतकऱ्यांना दिसून आला होता. यामुळे या भागात बिबट्याविषयीची कमालीची दहशत पसरली. या भागातील काही कुटुंबियांनी आपली घरे, पशुधनाचे गोठे, धान्यगुदामे लोखंडी, लाकडी जाळी लावून सुरक्षित करून घेतले आहे.