Leopard: मांजरीचे पिल्लू समजत बिबट्याच्या बछडांना खेळवले, 5 दिवसांनी झाला उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 07:15 PM2022-05-13T19:15:11+5:302022-05-13T19:16:31+5:30
कुटुंबातील चिमुकल्यांनी दुध पाजून, खाऊ घालत त्याच संगोपन व संरक्षण केलं
नाशिक : मालेगाव तालुक्यातील मोरदर शिवारात मादीपासून बिछडलेले अडीच महिन्याचे बिबट्याचे बछडे सैरभैर फिरताना कृष्णा ठाकरे यांच्या कुटुंबातील चिमुकल्यांना आढळून आले. मांजरीचे पिलू समजून त्यांनी बिबट्याचे बछडे घरी आणले होते. आठ दिवस या बछड्यांचा सांभाळ केल्यानंतर वन विभागाने हे बछडे नेले आहेत. या बछड्यांना घरातील लहान मुलांना चांगलाच लळा लागला होता.
कुटुंबातील चिमुकल्यांनी दुध पाजून, खाऊ घालत त्याच संगोपन व संरक्षण केलं. पाच दिवसानंतर हे बिबट्याचे बछडे असल्याचे लक्षात आले. तोपर्यंत कडाक्याच्या उन्हामुळे त्वचा रोग व अपेक्षित अन्न पाणी न मिळाल्याने बछड्याची प्रकृती खालावली. बिबट्याचे बछडे असल्याचे लक्षात येताच ठाकरे कुटुंबियांनी आठ दिवस संगोपन केलेले बछडे वन विभागाच्या ताब्यात सुपूर्द केले. त्यावेळी कुटुंबातील चिमुकल्या सदस्यांना गहीवरुन आले. वनविभागाने तीन दिवस उपचार करुन हे बछडे नाशिकला रवाना केले
काटवन परिसरातील मोरदर शिवारात जंगल आहे. या जंगलात काेल्हे, हरीण, बिबट्यांसह अन्य जंगली प्राण्यांचा वावर आहे. खाकुर्डी येथील कृष्णा ठाकरे यांचे कुटुंबिय माेरदर शिवारात वास्तव्याला आहे. शेताजवळ या कुटुंबातील मुलांना मांजरीच्या पिलासारखे गोंडस वेगळ्या रंगाचे बछडे दिसले. त्यांनी या बछड्याला घरी आणले. एकत्रित १८ ते २० जणांचे कुटुंब असल्याने या कुटुंबातील तिर्थ, वेदांत, दक्ष, अथर्व व दोन वर्षाची तनुजा या मुलांना बछड्याचा लळा लागला. बछडे त्यांचा जीव की प्राण झाले.
सोमवारी वन विभागाने या बछड्याला आणल्यानंतर पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. जावेद खाटीक यांनी त्याच्या त्वचारोगावर उपचार केले. बछडे वन विभागाकडे आल्यानंतर जेवण करत नव्हते. त्वचारोगा बरोबरच भूक न लागण्याचे औषधोपचारही या बछड्यावर करण्यात आले. तीन दिवसानंतर बछड्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर मालेगाव वन विभागाने बछड्याला नाशिक वनविभागाकडे सोपविले. नाशिक येथे काही दिवस संगोपन करुन या बछड्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल. बछडे दुरावल्याने मात्र ठाकरे कुटुंबातील चिमुकल्यांना करमेनासे झाले आहे.