विंचुरे परिसरात बिबट्याचा वावर
By admin | Published: January 31, 2015 12:16 AM2015-01-31T00:16:19+5:302015-01-31T00:16:29+5:30
विंचुरे परिसरात बिबट्याचा वावर
विंचुरे : बागलाण तालुक्यातील विंचुरे, जोरण, किकवारी आदि गावांमध्ये बिबट्याने दहशत घातली असून, त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याने परिसरात उच्छाद मांडला असून, पशुधनावर त्याने ताव मारायला सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराहट पसरली आहे. किकवारी येथील एका महिलेच्या पाच शेळ्या बिबट्याने फस्त केल्या. त्या महिलेला वनविभागाकडून नुकसानभरपाई मिळाली नाही, तोच बिबट्याने विंचुरे येथील आदिवासी शेतमजूर धोंडू सोनवणे हे नदी काठी शेळ्या चारत असताना बिबट्याने हल्ला करून शेळी ओढत नेली. सोनवणे यांनी त्याला हटकण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्या त्यांच्यावरच गुरगुरत शेळी घेऊन निघून गेला. बिबट्या मादी बरोबर तिचे दोन बछडेही आहेत. असे गावातील काही नागरिकांनी सांगितले. एके दिवशी तर चक्क संध्याकाळी बिबट्या गावातील आदिवासी वस्तीपर्यंत आल्याने नागरिक घाबरून गेले. विंचुरे येथील उपसरपंच हेमंत बच्छाव यांचा कुत्राही बिबट्याने फस्त केला. काही दिवसांपूर्वी किकवारी खुर्द येथील तरुण शेतकरी सतीश वाघ यांच्यावरदेखील ते शेतात गवत कापत असताना पाठीमागून हल्ला केला, मात्र सुदैवाने ते वाचले. नागरिकांनी सटाणा येथील वनविभाग कार्यालयात जाऊन पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा, अशी मागणी केली. पिंजरा लावला मात्र सहा दिवस पिंजरा लावूनही बिबट्या त्यात अडकला नाही. वनरक्षक शेख आणि त्यांचे एक सहकारी सहा दिवस रात्री पिंजऱ्या जवळ पहारा देत होते मात्र बिबट्या पिंजऱ्यात न आल्याने त्यांना नाइलाजाने पिंजरा तेथून काढावा लागला. (वार्ताहर)