नासलगावात गर्दीमुळे बिबट्या बिथरला; युवकाला मारला पंजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 03:48 PM2020-06-29T15:48:00+5:302020-06-29T15:57:37+5:30
बिबट्याच्या मागे गावकºयांनी धावाधाव करून परिस्थिती अधिक गंभीर बनवू नये, बिबट्याचा बंदोबस्त वनविभागाकडून करण्यात येईल, तोपर्यंत संयम ठेवावा,
नाशिक: तालुक्यातील पश्चिम भागात गंगापूर धरणाला लागून असलेल्या पिंपळगाव गरूडेश्वरजवळील नासलगाव शिवारातील एका नैसर्गिक नाल्यात बाभळीच्या वृक्षांच्या आडोशाला बिबट्याने काही गावकऱ्यांना दर्शन दिल्याने परिसरातील गावकऱ्यांची झुंबड बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी नाल्याकडे निघाली. दरम्यान, बिथरलेल्या बिबट्याने नाल्यातून पळून जात असताना अचानकपणे समोर आलेल्या एका ३३ वर्षीय युवकाला पंजा मारल्याची घटना सोमवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास घडली.
नाशिक पश्चिम वनविभागाच्या सातपूर परिमंडळातील शिवणगाव बीटात असलेल्या नासलगाव शिवारातील लोकवस्तीपासून वाहणा-या दीड ते दोन किलोमीटर अंतरावर एका नाल्यात बिबट्या दडून बसलेला असल्याचे काही ग्रामस्थांना दिसून आले. पोलीस पाटलांनी याबाबत तत्काळ वनविभागाला माहिती कळविली. माहिती मिळताच वनपाल ओंकार देशपांडे हे वनरक्षकांसह घटनास्थळी पोहचले. यावेळी बघ्यांची गर्दी प्रचंड असल्यामुळे वनकर्मचाºयांना गर्दीवर नियंत्रण मिळविणे अवघड होत होते. अखेर पोलीस पाटलांच्या मदतीने तत्काळ गिरणारे पोलीस ठाण्याला संपर्क साधण्यात आला आणि गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीसांची मदत मागितली गेली. काही वेळेत पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला असला तरीदेखील काही अतिउत्साही युवक पोलीस, वनविभागाच्या कर्मचा-यांना न जुमानता हातात लाठ्या-काठ्या घेत बिबट्याच्या दिशेने धावू लागले. यावेळी बिथरलेल्या बिबट्याने शांताराम बाळू दोबाडे (३३) या युवकाला पळताना पंजा मारला. यामुळे त्याच्या हाताचे कोपर जखमी झाले. त्याला तत्काळ ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आल्याचे देशपांडे यांनी सांगितले. पंजा मारल्यामुळे नखे लागली असून त्याची प्रकृती चांगली आहे. बिबट्या जेरबंद करण्याची मागणी गावक-यांकडून करण्यात आली आहे. या भागात लवकरच पिंजरा तैनात करण्यात येणार आहे. बिबट्याच्या मागे गावक-यांनी धावाधाव करून परिस्थिती अधिक गंभीर बनवू नये, बिबट्याचा बंदोबस्त वनविभागाकडून करण्यात येईल, तोपर्यंत संयम ठेवावा, जेणेकरून बिबट्या अधिक आक्रमक होणार नाही, असे आवाहन उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी केले आहे.