नाशिकमध्ये बलिकेला ठार मारणारा बिबट्या अखेर जेरबंद; पिंपळद पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निःश्वास
By अझहर शेख | Published: May 22, 2023 08:59 PM2023-05-22T20:59:12+5:302023-05-22T20:59:52+5:30
अत्यंत चपळ व चतूर अशा विचित्र स्वभावाचा हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद होत नव्हता. यामुळे वनपथकांचीही दमछाक झाली होती.
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद धुमाकूळ घालत बालिकांना ठार मारणारा बिबट्याला जेरबंद करण्यासाठी महिनाभरापासून वनखात्याकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात होते. या बिबट्याला शार्पशूटरद्वारे गोळ्या घालण्याची तयारीही वनखात्याने केली; मात्र बिबट्याचे नशिब चांगले की सोमवारी (दि.२२) त्यास जीवंत जेरबंद करण्यास वनकर्मचाऱ्यांच्या पथकाला यश आले.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद येथे ६एप्रिल रोजी बिबट्याने देविका सकाळे (५) या चिमुकलीला ठार केले होते. त्यापुर्वी पंचक्रोशीतील धुमोडी, वेळुंजे, ब्राम्हणवडे या गावांमध्येही बिबट्याने मानवी हल्ले करत लहानग्यांचा बळी घेतला हाेता. यामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली होती. महिनाभरापासून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी नाशिक पश्चिम वनविभागाचे पथक अहोरात्र युद्धपातळीवर प्रयत्न करत होते. २५पेक्षा जास्त पिंजरे व ट्रॅप कॅमरे या भागात तैनात करण्यात आले होते. खुल्या जागेत भक्ष्यदेखील ठेवण्यात आले; मात्र बिबट्या आणि वनकर्मचारी यांच्या पाठशिवणीचा खेळ सुरूच होता.
अत्यंत चपळ व चतूर अशा विचित्र स्वभावाचा हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद होत नव्हता. यामुळे वनपथकांचीही दमछाक झाली होती. या बिबट्याला शूट करण्याची परवानगी मागण्याचीही तयारी वनविभागाने केली होती. सोमवारी संध्याकाळी बिबट्याला जेरबंद करण्याचा अखेरचा प्रयत्न करायचा असे सकाळी ठरले आणि सुमारे २५ ते ३० वनाधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक पिंपळदला दाखल झाले. बिबट्याला शोधण्याची माेहिम सुरू केली गेली आणि बिबट्या एका शेतात दबा धरून बसलेला असल्याचे लक्षात येताच वनकर्मचाऱ्यांनी मोठी जाळी त्याच्यावर टाकून त्यास जीवंत जेरबंद केले. तत्काळ त्यास भुलीच्या औषधाचा ‘डार्ट’ दिला गेला आणि पिंजऱ्यात टाकून सुरक्षितरित्या घटनास्थळाहून वन्यजीव रेस्क्यू वाहनातून हलविण्यात आले. बिबट्या जेरबंद झाल्याने पिंपळद पंचक्रोशीतल गावकऱ्यांसह वनखात्यानेही सुटकेचा निश्वास सोडला आहे.
बिबट्याला जेरबंद कसे करावे, यासाठी वनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समितीही गठीत केली गेली होती. अखेर समितीनेही बिबट्याला गोळ्या घालण्याच्या विचाराला सहमती दिली. उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी बिबट्याला शूट करण्याबाबतची परवानगी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागितलीही होती.