बिबट्याची मादी अखेर जेरबंद
By admin | Published: September 26, 2015 09:54 PM2015-09-26T21:54:54+5:302015-09-26T21:56:21+5:30
शिंगवे : बछड्याच्या प्रेमापोटी मायेची शरणागती
निफाड : तालुक्यातील शिंगवे येथे बिबट्याला पकडण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वनविभागाच्या प्रयत्नांना शनिवारी (दि. २६) पहाटे यश आले. वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याचा बछडा अडकल्याने त्याची माताही पिंजऱ्यात आल्याने वनविभागाला बछड्यासह बिबट्याची मादी जेरबंद करण्यात यश आले आहे. या बिबट्याच्या मादीने शिंगव्यासह गोदाकाठच्या गावांमध्ये दहशत निर्माण केली होती.
येथील शेतकरी रामदास निवृत्ती रायते यांच्या शेतात वनविभागाने गुरुवारी (दि. २४) बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात बिबट्याचा बछडा अडकला. बछड्याने पिंजऱ्यात अडकताच डरकाळ्या फोडून परिसर दणाणून सोडला. त्यामुळे बछड्याची माता जवळच्याच उसातून बाहेर आली. मात्र बछड्याला पाहण्यासाठी नागरिकांनी के लेली गर्दी पाहून मादी पुन्हा लपली. मादी पुन्हा येण्याची शक्यता लक्षात घेऊन वनविभागाने याच पिजऱ्याला लागून दुसरा पिंजरा लावला.
दुसऱ्या दिवशी या पिंजऱ्यावरील आवरण बाजूला सारल्याचे लक्षात आल्याने वनविभागाने दोन्ही पिंजऱ्यांची जागा हलवली. त्यामुळे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही मादी पुन्हा बछड्याच्या मायेपोटी येथे आल्याने पिंजऱ्यात अडकली. सकाळी सहाच्या सुमारास बिबट्याची मादी पिंजऱ्यात अडकल्याचे लक्षात आल्यानंतर या मादीला बछड्यासह गंगापूर नर्सरी येथे हलविण्यात आले.
वर्षभरापासून वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गोदाकाठ परिसरात पिंजरे लावले होते. परंतु यात बिबटे अडकतच नव्हते. वर्षभरानंतर एक बछडा व त्याची माता या पिंजऱ्यात जेरबंद झाली आहे. वनविभागाचे अधिकारी गेल्या तीन दिवसांपासून परिसरात तळ ठोकून होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. (वार्ताहर)