पालखेड परिसरात बिबट्यांचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 06:26 PM2021-02-14T18:26:02+5:302021-02-14T18:26:31+5:30
वणी : पाणी व भक्ष्याच्या शोधार्थ असलेल्या जंगली श्वापदांनी मानवी वस्तीची वाट धरली असून काम सुरू असलेल्या नूतन बंगल्याच्या प्रवेशद्वारातून बिबट्यांनी प्रवेश केल्याने बंगल्यात असलेल्या कारागिरांना याची चाहूल लागताच त्यांची पाचावर धारण बसली. अखेर फटाक्यांचा आवाज करून बिबट्यांना पिटाळून लावले.

पालखेड बंधारा परिसरात काका गायकवाड नामक व्यक्तीच्या बंगल्याचे काम सुरू आहे. बंगल्याचे काम करणारे कारागीर याच ठिकाणी वास्तव्यास आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास या बंगल्याच्या भागात बिबट्याने प्रवेश केला. आवाजाने तेथे असलेले कारागीर जागे झाले व त्यांनी आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले असता बिबट्याची जोडी निदर्शनास आली. आरडाओरड करून ही माहिती संबधितांपर्यंत पोहोचवली. त्या दरम्यान परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले व त्या जोडीला हाकलून देण्यासाठी ग्रामस्थांनी फटाके वाजविले. घाबरलेल्या बिबट्यांनी तेथुन धूम ठोकली. दिंडोरी तालुक्यात काही ठिकाणी बिबट्यांचा वावर वाढला आहे. यापूर्वी बिबट्याने अनेकदा प्राणघातक हल्ले केले आहेत.
वनविभागाच्या कार्यक्षेत्रानुसार कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून गस्ती पथक कार्यान्वित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सायंकाळी मळ्या-खळ्यात राहणाऱ्यांनी बिबट्याचा धसका घेतल्याने याबाबत योग्य ती कार्यवाही तातडीने करण्याची मागणी केली जात आहे.