जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात बिबट्याचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 11:21 PM2020-07-22T23:21:10+5:302020-07-23T00:55:22+5:30
नाशिक तालुक्यातील जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात रात्रीच्या सुमारास बिबट्याने फेरफटका मारल्याने आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गेल्या तीन आठवड्यांपासून सातत्याने बिबट्या या भागात दर्शन देत असल्याने वनविभागाने त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
नाशिक : नाशिक तालुक्यातील जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात रात्रीच्या सुमारास बिबट्याने फेरफटका मारल्याने आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गेल्या तीन आठवड्यांपासून सातत्याने बिबट्या या भागात दर्शन देत असल्याने वनविभागाने त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
जातेगाव आरोग्य केंद्राची नवीन इमारत बांधण्यात आली असून, त्याला लागूनच अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने आहेत. त्यामुळे या आरोग्य केंद्रातील कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाºया रुग्णांचाही बºयाचवेळा मुक्काम असतो. मंगळवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र जायभावे आरोग्य केंद्रातील काम आटोपून निवासस्थानी गेले असता, थोड्या वेळातच त्यांना गुरगुरण्याचा आवाज आला. खिडकीतून त्यांनी डोकावून पाहिले त्यावेळी बिबट्या आरोग्य केंद्राच्या आवारात फिरताना दिसला, त्यांनी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून त्याचे चित्रीकरणही
केले.
दरम्यान, यापूर्वीही बिबट्याने दोनवेळा आरोग्य केंद्रात दर्शन देत बाहेरून पकडून आणलेले कुत्रे फस्त केले आहेत. आरोग्यसेविकेच्या घराच्या पायरीवरच कुत्र्याचा फडशा पाडल्यामुळे कित्येक दिवस आरोग्य कर्मचाºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दोन आठवड्यांपूर्वीच आरोग्य कर्मचाºयांनी वनखात्याकडे तक्रार केली असता, पिंजरा लावण्याचे मान्य करण्यात आले; परंतु अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
सध्या कोरोनामुळे आरोग्य कर्मचारी व अधिकाºयांना मुख्यालयी थांबणे तसेच दिवसरात्र कर्तव्यावर हजर ठेवण्यात येत असताना अशातच बिबट्याच्या सातत्याच्या संचारामुळे त्यांच्यात घबराट पसरली आहे. बुधवारी सकाळी बिबट्याच्या केंद्रात शिरकावाचे वृत्त कळताच जातेगावचे सरपंच, उपसरपंच, पोलीसपाटील आदींनी आरोग्य केंद्रात धाव घेतली.