थंडीचा कडाका कमी अन् धुके जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:41 AM2020-12-17T04:41:24+5:302020-12-17T04:41:24+5:30
मागील चार दिवसांपासून नाशिककरांना ढगाळ हवामानासह बेमोसमी पावसाच्या हलक्या सरींचाही सामना करावा लागत होता. सकाळ-संध्याकाळ पाऊस हजेरी लावत असल्याने ...
मागील चार दिवसांपासून नाशिककरांना ढगाळ हवामानासह बेमोसमी पावसाच्या हलक्या सरींचाही सामना करावा लागत होता. सकाळ-संध्याकाळ पाऊस हजेरी लावत असल्याने बळीराजा चिंतेत सापडला होता अन् वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाला होता. यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली होती. मंगळवारप्रमाणे बुधवारीही पहाटे अचानक धुक्यात प्रचंड वाढ झालेली दिसून आली. सकाळी साडेसहा वाजतापासून साडेआठ वाजतापर्यंत वातावरणात प्रचंड धुके अन् दवबिंदूंचा वर्षाव होत होता. संपूर्ण गोदाकाठ धुक्यात हरविला होता. जुने नाशिकपासून पुढे पंचवटी, मेरी, म्हसरुळ, मखमलाबाद, हनुमानवाडी, गंगापूररोड, आनंदवली, हिरावाडी, अमृतधाम, आडगाव या भागात सर्वाधिक दाट धुके पसरल्याचे चित्र पहावयास मिळाले. पेठरोडवरील हवामान केंद्राकडून मंगळवारी सकाळी ९८ टक्के तर बुधवारी थेट १०० टक्के इतकी आर्द्रता मोजली गेली.
दरम्यान, सकाळी नऊ वाजेपासून सूर्यप्रकाश पडत असल्याने मागील दोन दिवसांपासून वातावरणातील गारठा कमी झाला आहे. पुढील काही दिवस दररोज पहाटे शहरात धुक्याचे प्रमाण राहणार आहे.
--इन्फो--
वाढता वाढे आर्द्रता...
नाशिकमध्ये मागील तीन ते चार दिवसांपासून सकाळच्या सुमारास आर्द्रतेचा आलेख चढता आहे. १२ तारखेपासून सकाळी आर्द्रतेचे प्रमाण वाढतच राहिल्याचे दिसते. १ टक्क्यांवरून बुधवारी आर्द्रता थेट शंभर टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचली. यामुळे शहरात दररोज प्रचंड धुके दाटून येत आहे.
----कोट---
हिवाळा ऋतु अन् किमान तापमानात होणारी घट अन् हवेतील बाष्प व आर्द्रतेचे वाढलेले प्रमाण यामुळे अचानक धुके वाढले. रविवारी संध्याकाळी कोसळलेल्या सरींमुळेही धुक्याला निमंत्रण मिळाले. सूर्यदर्शन घडल्यामुळे ढग वितळू लागले आहे. जसेजसे आकाश निरभ्र होत जाईल, तशी थंडीची तीव्रता यापुढे अधिक वाढत जाणार आहे. डिसेंबरअखेरीस नाशिक शहर व निफाड, मालेगावात किमान तापमानाचा पारा ५अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षाही कमी होण्याची शक्यता आहे.
-सुनील काळभोर, हवामान तज्ज्ञ, नाशिक केंद्र प्रमुख.