बोरीपाडा रस्त्याच्या चौकशीकडे समितीची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 04:27 PM2019-07-10T16:27:36+5:302019-07-10T16:27:59+5:30
गावकऱ्यांकडून प्रतीक्षा : आदिवासी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेला वरसविहीर ते बोरीपाडा रस्ता जिल्हा परिषदेचा आहे असे भासवून बिल काढल्याच्या प्रकरणी नेमलेली चौकशी समिती ठरल्याप्रमाणे दि. ३ व ९ जुलै रोजी फिरकलीच नाही. मंगळवारी (दि.९) दिवसभर गावकरी तथा बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी या समितीच्या येण्याची वाट पाहत होते. दोनदा वेळ देऊनही समिती न आल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदिवासी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप माळेकर यांनी केला आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर ते बोरीपाडा या रस्त्याचे काम न करताच बिल काढल्याच्या तक्र ारीची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेने चौकशी समिती नियुक्त केली आहे. मात्र, दोनदा वेळ देऊनही प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी समिती फिरकलीच नाही. चौकशी समिती येणार म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, शाखा अभियंता, ठेकेदार अदिंसह ग्रामस्थ दिवसभर तळ ठोकून होते. समितीने पाठ फिरविल्याने गावक-यांची निराशा झाली आणि त्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, रस्त्याच्या चौकशीने त्र्यंबक तालुक्यातील दुर्गम भागात यापूर्वी झालेल्या अशाच प्रकारच्या कामांचे बिंग फुटण्याची आणि त्यामध्ये काही मोठे मासे जाळयात अडकण्याची शक्यता असल्याने टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप गावकºयांकडून केला जात आहे. वरसविहीर पासून बोरीपाडा हे अंतर १२०० मिटर आहे. या रस्त्याचे काम दोन भागात करावयाचे होते व त्यासाठी प्रत्येकी १५ लाख असे एकूण ३० लाख रु पये खर्च दाखविण्यात येवून ठेकेदाराने जिल्हा परिषद कडून बिल काढले आहे. प्रत्यक्षात हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेला असल्याचे जिल्हा नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर यांच्या लक्षात आले. जनतेच्या पैशांची लूट झाल्याचा आरोप करत त्यांनी ग्रामस्थासह याबाबत चौकशीची मागणी केली होती तसेच थाळीनाद आणि उपोषणाचाही मार्ग अवलंबला होता.