मोफत प्रवेशाकडे १ हजार ४११ पालकांची पाठ; आरटीईच्या २,७९७ जागांवरच प्रवेश !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 08:23 PM2021-07-11T20:23:09+5:302021-07-11T20:26:13+5:30
नाशिक जिल्ह्यात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील मोफत प्रवेश यंदा रखडलेलेच असून, कोरोनामुळे अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने शिक्षण विभागाने प्रवेशासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. राज्यस्तरीय सोडतीद्वारे निवड झालेल्या ४ हजार २०८ विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे
नाशिक : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील मोफत प्रवेश यंदा रखडलेलेच असून, कोरोनामुळे अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने शिक्षण विभागाने प्रवेशासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. राज्यस्तरीय सोडतीद्वारे निवड झालेल्या ४ हजार २०८ विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यस्तरीय लॉटरी प्रक्रियेत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांचे २३ जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहेत. आरटीईअंतर्गत नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. ११) सायंकाळपर्यंत २ हजार ७९७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, अजूनही १ हजार ४११ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळूनही त्यांनी प्रवेश घेतलेले नाहीत. या विद्यार्थ्यांच्या पालकांना वाढीव मुदतीत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. नाशिक जिल्ह्यात आरटीई प्रक्रियेंतर्गत आतापर्यंत २ हजार ७२७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. यापूर्वी पहिल्यांदा ३० जूनपर्यंतची प्रवेशाची मुदत संपल्यानंतर पहिल्यांदा ९ जुलैपर्यंत व त्यानंतर आता दुसऱ्यांदा २३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, आरटीई प्रवेश प्रक्रियेंतर्गत राज्यस्तरावरून सोडत जाहीर झाल्यानंतर कोरोनामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याला विलंब झाला आहे. त्यामुळे निश्चित मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू न शकणाऱ्या पालकांना मुदतवाढ मिळाली असून, वाढीव मुदत संपल्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.