पोटाचा घेर कमी करण्यासाठी दीक्षित गुरूजींनी दिले पोलिसांना ‘डायट’चे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 05:13 PM2019-04-13T17:13:40+5:302019-04-13T17:44:49+5:30
पोलीस व त्यांच्या कुटुंबियांचे वाढते वजन व सुटलेले पोट तसेच आजार रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात विनासायास वेटलॉस व मधुमेह प्रतिबंध या विषयावर डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन केले होते.
नाशिक : सातत्याने ‘ड्यूटी’वर कार्यक्षम राहत समाजाच्या सुरक्षिततेची जबाबदारी पेलणाऱ्या ‘खाकी’ने स्वत:चे आरोग्यही उत्तमरित्या राखणे गरजेचे आहे. पोलिसांचे आरोग्य उत्कृष्ट असेल तर ते आपले कार्य चोखपणे बजावू शकतात. हे लक्षात घेत पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ‘उत्कृष्ट आहार अन् उत्तम जीवनशैली’ या विषयावर डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी पोलिसांना डायटविषयी धडे दिले.
पोलीस व त्यांच्या कुटुंबियांचे वाढते वजन व सुटलेले पोट तसेच आजार रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात विनासायास वेटलॉस व मधुमेह प्रतिबंध या विषयावर डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन केले होते.
यावेळी दीक्षित म्हणाले, जगामध्ये अनेक डाएट प्लॅन आले आहेत. ज्या प्लॅनने तुमचे वजन कमी होते, पोटाचे घेर कमी होतो व तीन महिन्यांच्या सरासरी मधुमेह व फास्टींग इन्शुलीन कमी होते. तो डाएट प्लॅन उत्कृष्टच आहे. आम्ही संशोधन करून असाच प्लॅन तयार केला असून तो कोणताही सर्वसामान्य व्यक्ती, कोणत्याही वयातील सहज पाळू शकतो व त्याद्वारे सुदृढ राहू शकतो. यामध्ये दिवसभरात ५५ मिनीटात दोन वेळा जेवावे, ४५ मिनीटे पायी चालण्याचा व्यायाम करावा, मधल्या वेळात भूक लागली तर ताक, ब्लॅक टी, ग्रीन टी, नारळपाणी घेण्यास हरकत नाही. अथवा एखादा टोमॅटो खाऊ शकता. असा अगदी सोपा डाएट असून नोंंदणी करून सर्वांनी तो पाळावा असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस व त्यांच्या कुटुंबियांना या ताणतणावाच्या स्थितीता आहारशैली व पथ्ये पाळून आरोग्य सांभाळण्याचा सल्ला दिला. या प्रसंगी पोलीस उपायुक्त अमोल तांबे, पौर्णिमा चौघुले, माधुरी कांगणे आदि उपस्थित होते. प्रास्ताविक उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी केले.