शेतकऱ्यांची कर्जफेडीकडे पाठ
By admin | Published: March 27, 2017 12:51 AM2017-03-27T00:51:48+5:302017-03-27T00:52:00+5:30
सायखेडा : शेती आणि शेतीसंदर्भातील मध्य मुदत पीककर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची होणारी धावपळ यंदा मार्च एण्डजवळ आला तरी किंचितही पाहायला मिळत नाही.
सायखेडा : शेती आणि शेतीसंदर्भातील मध्य मुदत पीककर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची होणारी धावपळ यंदा मार्च एण्डजवळ आला तरी किंचितही पाहायला मिळत नाही. शेती आणि शेतीवर आधारित सर्व कर्ज मार्च महिन्यात भरावे लागते. शेतीचे उत्पन्न झाले असो अथवा नसो पण मार्च महिन्यात सोसायटीचे कर्ज फेडावेच लागते. प्रत्येक वर्षी मार्च महिना आला की शेतीवरील पीककर्ज आणि मध्यम मुदत कर्जफेड करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असायची; पण सलग तीन वर्षे दुष्काळी स्थितीमुळे आणि यंदा शेतमालाला असलेला कवडीमोल भाव यामुळे शेतकरी संपूर्ण डभघाईस गेल्यामुळे कर्जफेडीकडे त्याने पाठ फिरवल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने अनेक मोठ्या सहकारी सोसायटी आणि जिल्हा बँकेच्या शाखांना दिलेले वसुलीचे टार्गेट आता कसे पूर्ण होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीमालाचे शासन स्तरावरील निर्यातीचे कुचकामी धोरण असल्याने शेती सतत तोट्यात आहे, तसेच खत ,बी बीयाने यांच्या वाढत्या किंमती, शेतीसाठी लागणारी मजुरी, बदलते वातावरण, अनियमित पाऊस, यामुळे शेती वर्षानुवर्षे तोट्यात असल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. कुटुंब कसे चालवायचे, मुलांचे शिक्षण , मुलींचे लग्न कसे करावे, असे अनेक कौटुंबिक प्रश्न शेतकऱ्यांपुढे आ वासून उभे राहिले आहे अशा परिस्थितीत कर्ज कसे भरावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारचे अर्थ संकल्प अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या पहील्या दिवसापासून विरोधी पक्षांनी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला आहे. शेतकरी आणि कर्जमाफी या प्रमुख मुद्यांनी संपूर्ण अधिवेशन गाजले यामुळे ठिकठिकाणी शेतकरी वेगवेगळे आंदोलने करत आहेत. विरोधी पक्ष शेतकरी संघर्ष यात्रा काढणार आहे , त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकार कर्जमाफी करण्यासाठी अनुकूल आहे मात्र योग्य वेळ येऊन द्यावी लागेल असे वारंवार सांगितले त्यामुळे सरकार आज ना उद्या नक्कीच कर्जमाफी करेल अशी भोळी आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकलेले असेल त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होतो असा मागील इतिहास आहे त्यामुळे आपण कर्जफेडले तर आपल्याला कर्जमाफीचा फायदा होणार नाही त्यामुळे कर्जफेडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसत नाही. कर्जफेड करण्यास आज शेतकऱ्यांंची परिस्थिती अनुकूल नाही, काही मोठ्या शेतकऱ्यांची असली तरी कर्जमाफीचा फायदा उचलण्यासाठी शेतकरी कर्ज फेड करत नाही. त्यामुळे सहकारी संस्था अडचणीत येण्याची शक्यता आहे. जिल्हा बँक आणखीच तोट्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांचे देखील कर्ज वाढणार आहे, परिणामी शेतकरी आत्महत्त्येचे प्रमाण वाढण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. यामुळे कधीतरी कर्जमाफी करण्यास अनुकूल असलेल्या सरकारने तात्काळ कर्जमाफी द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)