स्थायी समितीचे सभापती म्हणून काम करताना धडा मिळाला: हिमगौरी आडके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 03:45 PM2019-03-02T15:45:28+5:302019-03-02T15:49:15+5:30

नाशिक - महापालिकेत लाख मोलाची समिती म्हणून स्थायी समितीकडे बघितले जाते. या समितीला आर्थिक, प्रशासकिय आणि अनेक अधिकार असतात. ...

Lessons found as working as a Standing Committee Chairman: Himgauri Adke | स्थायी समितीचे सभापती म्हणून काम करताना धडा मिळाला: हिमगौरी आडके

स्थायी समितीचे सभापती म्हणून काम करताना धडा मिळाला: हिमगौरी आडके

Next
ठळक मुद्देफायनान्स मॅनेजमेंटचे शिक्षण घेतल्याने कामकाज करणे सोपे झालेशहरहित आणि पक्षाच्या भूमिकेचा विचार करूनच कामकाजअविश्वास ठराव आणि आयुक्तांच्या बदलीत चार महिने कामकाज रखडले

नाशिक - महापालिकेत लाख मोलाची समिती म्हणून स्थायी समितीकडे बघितले जाते. या समितीला आर्थिक, प्रशासकिय आणि अनेक अधिकार असतात. त्यामुळे ही समिती अत्यंत महत्वाची असल्याने बहुधा पुरूष मंडळी त्यात महिलांना सभापतीपदी संधी देत नाही. महापालिकेच्या सुमारे २८ वर्षांच्या लोकनियुक्त कामकामाजाच्या कारकिर्दीत प्रथमच हिमगौरी आडके या स्थायी समितीच्या सभापती म्हणून निवडल्या गेल्या. अनेक अडथळे, वाद विवाद आणि आव्हाने अशा स्थितीत स्वत:च कामकाज चालवून धाडसी निर्णय घेण्याची जबाबदारी हिमगौरी आडके यांनी पार पडली. या समितीसाठी कामकाज करताना शिकायला मिळाले आणि कामकाजाचे धडे मिळत गेले असे हिमगौरी आडके यांनी सांगितले आणि वर्षभराच्या अल्पकालवधीत जे जे शक्य आहे, ते सर्व केल्याचे त्यांनी सांगितले. पद हे वर्षभरापुरतेच असले तरी नगरसेवक म्हणून कामकाज करण्याची संधी कायम असल्याने यापुढेही शहरात चांगले प्रकल्प राबविण्यासाठी पाठपुरावा करीत राहू असे त्यांनी लोकमतशी सांगितले.

प्रश्न: स्थायी समितीचे एकंदरच अधिकार बघता ही समिती सहसा महिलांना दिली जात नाही. नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या पहिल्या महिला सभापती म्हणून कामकाज करताना अनुभव कसा वाटला?
आडके: महिला म्हणून काम करताना समितीत खूप शिकायला मिळाले. पक्षाने खूप मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि स्थायी समितीसारख्या अधिकाराच्या दृष्टीने जबाबदारी विश्वासाने सोपवली त्याबद्दल मी मुख्यमंत्री तसेच पक्षाच्या सर्वच नेत्यांचे आभार मानते. मी यापदासाठी पात्रही होते. त्यामुळेच ही संधी पक्षाने दिली. मी फायनान्स मॅनजमेंटचे शिक्षण घेतले असल्याने आर्थिक अधिकार असलेली समितीत काम करता आले. पक्षाने मला एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. आणि ती भूमिका योग्य रीतीने पार पडली.

प्रश्न: समितीत काम करताना अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप झाले, गोंधळ झाले, पक्षातील काही सदस्यांनी देखील विरोध केला. तरीही आव्हानात्मक परिस्थितीत काम कसे केले?
आडके: वर्षभराच्या कामकाजात अनेक अडचणी आल्या तरी त्यातून अनुभव येत गेले आणि धडे मिळत गेले. एखाद्या विषयाबाबत काय निर्णय घ्यायचा याची स्पष्टता स्वभावात असली तर अडचण येत नाही. नाशिककरांचे हित आणि पक्षाची भूमिका यानुसार निर्णय घेतले. असे निर्णय घेताना कोणाला काय वाटले किंवा विरोधकांना काय वाटले हा मुद्दा गौण होता.

प्रश्न: समितीच्या माध्यमातून कोणती चांगली कामे केल्याचा आनंद वाटला?
आडके: महापालिकेच्या माध्यमातून अनेक चांगली कामे केली. शिवाय अंदाजपत्रकात अनेक चांगल्या तरतूदी केल्या आहेत. चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारकाचे पीपीपीच्या माध्यमातून चित्रपट नगरी साकारण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे व्दारका येथे अटल उद्योग संकुल देखील खासगीकरणातून साकारण्यात येणार आहे. महापालिकेच्या ज्या शाळा इमारती पडून आहेत, त्या इमारती खासगी शिक्षण संस्थांना देऊन पीपीपी तत्वावर सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्यात येणार आहे. अनेक चांगले उपक्रम राबविण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.

प्रश्न: सभापतीपदाचा कार्यकाळ पूर्ण झाला परंतु काय व्हायचे राहुन गेले असे वाटते?
आडके: सभापतीपदाचा कार्यकाळ मुळातच एक वर्षाचा. त्यातही आयुक्तांवर अविश्वास ठराव आणि नंतर आयुक्तांची बदली यात दोन ते तीन महिने निघून गेले. परंतु शक्य तेवढे चांगले निर्णय घेतले. परंतु समितीचे पद गेले म्हणजे शहरासाठी काही करता येणार नाही अशातला भाग नाही. नाशिककरांच्या दृष्टीने शहर बस सेवा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यासाठी नंतरही काम करता येईल नगरसेवक म्हणून महापालिकेत असल्याने चांगल्या प्रोजेक्टसाठी पाठपुरावा करतच राहील.

मुलाखत- संजय पाठक

Web Title: Lessons found as working as a Standing Committee Chairman: Himgauri Adke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.